ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले

घडकूज, घडगळ होण्याबरोबरच रोगांचा प्रादूर्भावाची शक्यता
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले

निफाड। प्रतिनिधी Niphad

तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान (Cloudy weather) तयार झाल्याने द्राक्ष पिकावर भुरी, डावणी रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याबरोबरच दोडा गळ, घडकूज व फुटव्यातील घड जिरण्याची शक्यता असल्याने प्रतिकूल हवामानापासून हातात आलेल्या बागा वाचविण्यासाठी शेतकरी (farmer) रात्रीचा दिवस करीत किटकनाशक औषधांची फवारणी (Spraying of pesticides) करण्यात व्यस्त झाला आहे.

हवामान विभागाने (Meteorological Department) पावसाचा अंदाज (Rainfall forecast) वर्तविल्याने गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण तयार होवून कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची परिस्थिती तयार झाली आहे. तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर द्राक्षबागा (Vineyard) उभ्या असून ढगाळ हवामानामुळे ज्या द्राक्षबागा दोडा स्टेज मध्ये आहे त्याची मणीगळ होण्याचा धोका वाढला असून प्रतिकूल हवामानामुळे घडकूज, घडगळ होण्याबरोबरच फुटव्यातील द्राक्षबागामधील घड जिरण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक आहे.

तसेच द्राक्षबागांवर भुरी व डावणीचा प्रादूर्भाव देखील वाढण्याची परिस्थिती तयार होत असून ज्या द्राक्षबागा मणी स्टेजमध्ये आहे तेथे मिलीबग रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. परिणामी ढगाळ हवामानापासून द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करण्यात व्यस्त झाला असून यामुळे द्राक्षबागेवरील खर्चात वाढ झाली आहे.

द्राक्षाप्रमाणेच कांदा पिकावर फुलकिडीच्या प्रादूर्भावासह मावा, करपा रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षापासून करोना प्रादूर्भावामुळे हातात आलेले द्राक्षाचे पीक शेतकर्‍यांना मातीमोल भावाने विक्री करावे लागले होते. त्यामुळे यावर्षी द्राक्ष पिकाला चांगला बाजारभाव मिळेल ही अपेक्षा ठेवत शेतकर्‍यांनी द्राक्षबागेचे योग्य नियोजन करीत मोठ्या प्रमाणात खर्च केला.

मात्र आता गत दोन दिवसापासून ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची परिस्थिती तयार झाल्याने प्रतिकूल वातावरणाचा शेतकर्‍यांनी धसका घेतला असून कुठलीही जोखीम नको म्हणून शेतकरी रोगप्रतिकारक औषधे फवारणीला महत्व देत असून अनेक शेतकर्‍यांनी पुढील थंडीचा अंदाज घेत द्राक्षबागेत चिपाटे पसरून ठेवली आहे.

ढगाळ वातावरणाचा कांदा रोपावर देखील परिणाम जाणवू लागला असून रोपावर बुरशीजन्य रोगाबरोबर रोपांची वाढ खुंटणे, रोप जळण्याचे प्रमाण वाढणे असे प्रकार घडू लागले आहेत. एकूण कांदा असो की द्राक्षपिक अगर भाजीपाला प्रतिकूल हवामानाचा फटका पिकांना बसू नये याची पुरेपुर काळजी घेतांना शेतकरी दिसत असून त्यामुळे या पिकावरील उत्पादन खर्चात वाढ होवू लागली आहे. त्यातच खते, बियाणे, औषधांच्या किंमती गगनाला भिडल्या असून शेतकर्‍यांनी पिकविलेल्या मालाला मात्र पाहिजे त्या तुलनेत बाजारभाव मिळतांना दिसत नाही.

फवारणी खर्च वाढला करोना प्रादूर्भावामुळे मागील वर्षी द्राक्षबागा उशिरा खाली झाल्या असल्या तरी त्यावेळी तोट्यात द्राक्षे विकावी लागली होती. यावर्षी मागील पिकाची भरपाई भरून निघेल अशी अपेक्षा होती. परंतु सततचे ढगाळ वातावरणाबरोबरच पुढे थंडीचा जोर वाढला तर रात्रीचा दिवस करून बागा वाचवाव्या लागतील. आत्ताच्या प्रतिकूल हवामानामुळे सकाळ, सायंकाळ रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करावी लागत असून त्यामुळे खर्चात मोठी वाढ होवू लागली आहे. दोन पैसे मिळवून देणारे द्राक्ष पीक आता जुगार ठरू लागले आहे.

सुनील भुतडा, द्राक्ष उत्पादक शेतकरी (निफाड)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com