डांगर लागवडीतून द्राक्ष बागायतदाराला साडेतीन लाखांचे उत्पन्न

डांगर लागवडीतून द्राक्ष बागायतदाराला साडेतीन लाखांचे उत्पन्न

ओझे | विलास ढाकणे

अनेक वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आहे. प्रत्येक द्राक्ष हंगामात शेतकरी कर्जबाजारी होताना दिसत आहे. हवामान बदलाचा विचार करून दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथील प्रयोगशील शेतकरी विलास जाधव यांनी आपल्या दोन एकर द्राक्ष बागेला कुऱ्हाड लावली. आपण कमी खर्चात परवडणारी शेती केली पाहिजे, असा विचार मनात धरून डांगर लागवडीला सुरुवात केली...

द्राक्षबाग तोडल्यानंतर शेताची कोणतीही मशागत न करता द्राक्षवेलीची खुटके ट्रॅक्टरने काढून घेतले. त्याच द्राक्षवेलीच्या ठिकाणी डांगराचे बियाणे टोचण्यात आले. बागेला ठिबक सिंचन असल्यामुळे तो खर्च करण्याची वेळ आली नाही.

साधारणपणे दोन एकरात दोन हजार डांगर बियाण्याची टोकन पध्दतीने लागवड करण्यात आली. दोन सरीमधील अंतर ९ बाय ६ असल्यामुळे डांगर वेल जमिनीवर पसरण्यास कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही. यामुळे वेलीची वाढ अतिशय चांगली झाली.

द्राक्ष बागेला प्रत्येक वर्षी टाकलेले शेण खत, जैविक व रासायनिक खतांचा डांगरवेलीला मोठा फायदा झाला. वेलीला चांगला बहर येऊन ८० दिवसात डांगर तोडणीसाठी तयार झाले. एका वेलीवर साधारणतः ७० ते ८० किलो डांगराचा माल मिळाला.

नाशिक मार्केटमध्ये सध्या ३५ ते ४० टन मालाची हातविक्री स्वतः शेतकरी करीत आहेत. आठ ते दहा रुपये प्रति किलो दर मिळत आहे. डांगर तोडणीनंतर दोन ते तीन महिने साठवून ठेवता येतो. त्यमुळे बाजारभावानुसार मालाची विक्री करता येते.

विलास जाधव यांनी अतिशय कमी खर्चात हे पिक घेतले आहे. त्यांनी बाराशे रुपयाचे बियाणे विकत घेतले. पिकांवर कुठल्याही रासायनिक औषधाची फवारणी केली नाही. अल्प भांडवलामध्ये त्यांना साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

सध्याच्या परिस्थितीत हमीभाव नसल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. यासाठी शेतकरी वर्गाने कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन काढता येईल अशा पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. हवामान बदलांवर आधारित पिकांची पेरणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

विलास जाधव, शेतकरी, करंजवण.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com