भारीच ! विहिरीत पडलेल्या ७३ वर्षांच्या आजीला महिलांनी काढले बाहेर

निफाड तालुक्यातील घटना
भारीच ! विहिरीत पडलेल्या ७३ वर्षांच्या आजीला महिलांनी काढले बाहेर

करंजीखुर्द । Karanjikhurd

येथील महिला दिव्या अडसरे व तरूणांच्या सतर्कतेमुळे विहिरीत पडलेल्या सीताबाई निंबाळकर (73) या वृद्ध महिलेस जीवदान मिळाले आहे.

करंजी खुर्द गावापासून साधारण एक ते दीड किमी अंतरावर असलेल्या दशरथ तासकर यांच्या गट नंबर 156 मध्ये म्हसोबा देवस्थानाच्या दर्शनासाठी सीताबाई रामचंद्र निंबाळकर (73) या वृद्ध आजी शुक्रवारी गेल्या होत्या. मात्र गुरुवारी परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने शेतात काही काम नसल्याने आजूबाजूला कोणी नव्हते.

परंतु येथूनच जवळ काही फुटावर शेतात महिला कांदे निदनी करत होत्या. परंतु जवळच काटेरी झुडपे असल्याने त्यातून काहीतरी आवाज येत असल्याने दिव्या अडसरे या महिला आवाजाच्या दिशेने गेल्या. तरी पण काटेरी झुडपामध्ये विहिरीमध्ये आवाज येत आहे हे लक्षात आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून बघितले तर 50 ते 60 फूट खोल असलेल्या तर साधारण 30 ते 40 फूट पाणी असलेल्या विहिरीत वृद्ध महिला पाईपला धरून बसल्या असल्याचे पाहून त्यांनी आपल्या शेतात असलेल्या महिलांना हा प्रकार सांगितला.

लगेच दिव्या अडसरे या गावाच्या बाजूला असलेल्या किरण अडसरे यांच्या घरी जाऊन घडलेला प्रसंग सांगितला. तर दुसरी महिला रूपाली अडसरे यांनी मळ्यातील जवळच असलेल्या गौतम अडसरे यांना सांगितले व फोनवरून गावात माहिती दिल्याने किरण अडसरे यांनी एक ते दीड किमी अंतरावर पळत दोर व खाट आदी साहित्य घेऊन आले.

तोपर्यंत येथील युवक गौतम अडसरे व राहूल निंबाळकर यांनी विहिरीत उतरून आजीला मोटर फाऊंडेशनवर बसवून ठेवत धीर देत होते. नंतर विहिरीजवळ महिला व तरूण जमा झाल्याने त्यांनी विहिरीत दोराच्या सहाय्याने खाट सोडून सदर वृद्ध महिलेला सुखरूप बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून वृद्ध महिलेचा जीव वाचल्याचे समाधान सर्वांच्या चेहर्‍यावर दिसत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com