
पंचवटी | वार्ताहर
नातू घराबाहेर जाऊ देत नाही म्हणून महिन्याभरापूर्वी हरसूल पोलिस ठाण्यात नातवा विरुद्ध तक्रार केल्याचा राग मनात धरून नातवाने आजोबांचा खून करत मृतदेह चारचाकी वाहनातून नेत आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओढा शिवारात असलेल्या नाल्यात फेकून दिल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे.
या घटनेत गिरणारे येथील धोंडेगावात राहणाऱ्या रघुनाथ श्रावण बेंडकुळे (७०) या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या खून प्रकरणी आडगाव पोलिसांनी संशयित आरोपी नातू किरण निवृत्ती बेंडकुळे (२३) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त केली आहे. आजोबा वृद्ध असल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे तसेच ते विनाकारण घराबाहेर किंवा मंदिरात जातात म्हणून त्यांना कित्येक दिवस नातू किरण हा लोखंडी साखळीने घरात बांधून ठेवायचा.
महिन्याभरापूर्वी आजोबा रघुनाथ बेंडकुळे यांनी हरसूल पोलिस ठाण्यात धाव घेत नातू किरण हा आपल्याला घराबाहेर तसेच मंदिरात जाऊ देत नाही व हातापायाला लोखंडी साखळीने बांधून ठेवत असल्याची तक्रार केली होती.
आजोबांनी तक्रार केली याचा राग आल्याने संशयित आरोपी किरण याने रविवारी रात्री आजोबा रघुनाथ यांना रात्री घराबाहेर झोपलेले असतांना तोंडाला घट्ट चिकट पट्टी लावून तसेच हातापायाला लोखंडी साखळी बांधून त्यांना मारुती ओमनीत टाकून क्रमांक (एम एच १५ इबी ३९१९) गाडी धोंडेगाव मार्गे मखमलाबाद येथून आडगाव शिवारातील ओढा गावात असलेल्या नाल्याकडे आणली व तेथून मृतदेह नाल्यात फेकला.
दुसऱ्या दिवशी ओढा येथिल नाल्यात एका वृध्द इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान खान यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, दशरथ पागी, गणपत ढिकले, देविदास गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सदरचा प्रकार हा घातपाताचा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितास अटक केल्याची माहिती उपायुक्त अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धेर्यशील घाडगे करीत आहे.