ग्रामपंचायत सेवकांचे आज कामबंद आंदोलन

ग्रामपंचायत सेवकांचे आज कामबंद आंदोलन

तळेगाव । वार्ताहर Dindori / Talegaon

दिंडोरी तालुक्यातील काही ग्रामपंचायत सेवकांना अद्यापही शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन मिळत नाही.

मागील किमान वेतन उशिरा अदा केले असल्यामुळे वेतन व राहणीमान भत्ता फरक कर्मचार्‍यांना अद्यापही मिळालेला नाही.

ग्रामपंचायत सेवकांना परिमंडळनिहाय सुधारित किमान वेतन लागू करून 30 जून 2019 पासून लागू करण्यात आलेल्या 4050 रुपये राहणीमान भत्ता एकत्रित अदा करावे, या मागणीसाठी दि.28 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्र व्यापी काम बंद आंदोलन करण्यात आहे, याबाबत दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भावसार यांना निवेदन देण्यात आले.

शासनाने ग्रामपंचायत सेवकांना लागू केलेल्या विविध सेवा सवलतीच्या लाभापासून वंचित असून ग्रामपंचायत स्तरावरून शासन निर्णयाची पायमल्ली होतानाचे चित्र दिसून येत आहे. शासन नियमाप्रमाणे सेवकांना लागु केलेल्या विविध सेवा सवलतींची ग्रामपंचायत स्तरावरून अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामपंचायत सेवकांवर अन्याय होत आहे.

किमान वेतन मिळण्यासाठी अडथळा निर्माण करणारी वसुलीची व उत्पन्नाची अट असलेला 28 एप्रिल 2020चा शासन निर्णय रद्द करा, शासन स्तरावरून किमान वेतन राहणीमान भत्ता वेतनापोटी 100 टक्के मिळालाच पाहिजे, कालबाह्य ठरणारा जाचक लोकसंखेचा आकृतिबंध रद्द करावा, कपात केलेल्या भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा आदी मागण्याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढाकणे, उपाध्यक्ष विनोद जाधव, सचिव भाऊराव ऊफाडे आदींच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com