साहेब! बोनस देत नसाल तर किमान मागील फरक तरी द्या

साहेब! बोनस देत नसाल तर किमान मागील फरक तरी द्या
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यातील बर्‍याच ग्रामपंचायतींनी (Gram Panchayat) ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान (Special Allowance), दिवाळी बोनस (Bonus) न दिल्याने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची दिवाळी (Diwali) या वर्षी अंधारात असल्याची खंत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कर्मचार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे...

बोनस जरी देत नसाल तर आमचा मागील फरक तरी द्या, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. करोनाकाळात (Corona) पोलीस प्रशासन, डाॅक्टर, आरोग्य सेवक यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी करोना रुग्णांची अहोरात्र सेवा केली. शासन स्तरावर करोना योध्दा म्हणून या कर्मचाऱ्यांकडे पहिले जाते.

आज याच कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. ऐन दिवाळीत या कर्मचाऱ्यांना विना अनुदान व विना दिवाळी बोनस साजरी करावी लागणार आहे.शासनाने पंचायत राजमध्ये घटना दुरूस्ती करून ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणाची मोहीम सुरु केली असली तरी अजूनही व्यवस्थेतील यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे हाल होत आहेत.

तालुक्यात सुमारे १२० ग्रामपंचायती असून कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. वेतनासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान अर्धेच दिले जाते. सुविधांचा अभाव, सेवा नियमांच्या नावाने बोंबाबोंब अशा समस्यांच्या गर्तेत कर्मचारी अडकले आहेत.

जिल्हा परिषदेचा सर्वात तळाचा कर्मचारी म्हणजे ग्रामसेवक हे आपल्या सेवाविषयक हक्कांसाठी जागृकता दाखवतात. परंतु, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांकडे दुर्लक्ष करतात. ग्रामविकास विभागाने लोकसंख्येनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला किती कर्मचारी नियुक्त करायचे याचा आकृतिबंध ठरवून दिला आहे.

कर्मचाऱ्यांच्या निम्या वेतनासाठी शासन ग्रामपंचायतीला अनुदान देते. कर्मचार्‍यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता किती द्यावे हे शासनाने सन २००७ मध्येच ठरवून दिले आहे. ग्रामपंचायतींचे उत्पन्न कमी असल्याने त्यांना किमान वेतन देणे परवडत नाही, असा युक्तीवाद केला जातो.

दिवाळी सणानिमित्त ग्रामपंचायतींकडून कर्मचार्‍यांना सानुग्रह, व दिवाळी बोनस देण्यात यावे. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भावसार यांनी लक्ष घालावे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com