नाशिक । प्रतिनिधी

नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव बसवंत, नांदगाव, येवला, नाशिक, मालेगाव येथील शासकीय गोदाम बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात अन्न,धान्याची अधिक साठवणूक करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी यांनी मौजे पिंपळगाव बसवंत ता. निफाड, नांदगाव ता. नांदगाव, अंगणगाव ता . येवला , मौजे राजूरबाहूला ता . नाशिक , मौजे चंदनपुरी ता. मालेगाव येथील नवीन गोदाम बांधकामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन देण्याबाबत पत्रान्वये विनंती केली होती.

त्यानुसार नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव बसवंत ता.निफाड, नांदगाव ता.नांदगाव, अंगणगाव ता.येवला, मौजे राजूरबाहूला ता.नाशिक ( ०३ गोदाम ), मौजे चंदनपुरी ता.मालेगाव ( ०२ गोदाम ) येथील ०८ गोदामांच्या बांधकाम अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये अन्न, धान्याची साठवणूक करण्यासाठी अधिक आठ गोदामे मंजूर झाल्याने जिल्ह्यातील अन्न, धान्य साठविण्याची क्षमता अधिक वाढणार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाद्वारे खरेदी केलेले अन्न धान्य साठवणूक करण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर रेशन व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अन्न, धान्याचा साठा निर्माण होऊन अन्न, धान्याची टंचाई देखील त्यामुळे निर्माण होणार नाही.