
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर सोसायटीकडून आधारभूत किमतीत धान खरेदी केंद्र (Grain Shopping Center) सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी दीड लाखांच्या आसपास भात खरेदी झाली. आदिवासी विकास महामंडळाकडून उपअभिकर्ता म्हणून त्र्यंबक आदिवासी सोसायटी हे धान्य खरेदी करते...
या केंद्राचे उद्घाटन त्र्यंबक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व बाजार समिती संचालक संपतराव सकाळे यांच्या हस्ते झाले. सोसायटीचे चेअरमन दौलत आचारी, व्हा. चेअरमन नवनाथ कोठुळे, संचालक रावजी दिवे, बाळू गमे, युवराज कोठुळे, आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बनसोडे, सहकारी गायकवाड, नवगिरे, संस्थेचे सचिव एकनाथ गुंड, रामदास आहेर व बाळू भारस्कर तसेच शेतकरी लक्ष्मण महाले (गणेशगाव) आदी उपस्थित होते.
भात 1940 ते 1960 (क्विंटलला) रुपये दराने खरेदी केला. दरम्यान, भात खरेदी केंद्र गोदाम गणपत बारी येथे असून या गोदामाची दुरवस्था झालेली आहे. फरशा उकरल्या आहेत, पावसाळ्यात पत्रे गळतात. सहकार विभाग, आदिवासी विकास महामंडळ तसेच नेतेमंडळींचे दुर्लक्ष असल्याचे जाणवत आहे, असे उपस्थितांच्या निदर्शनास आले. त्र्यंबक तालुक्यात अजून दोन ठिकाणी धान्य खरेदी केंद्र सुरू होणार असून हे पहिले केंद्र आहे. शासनाने भाव वाढून दिल्यास खरेदीत वाढ होईल, असे चित्र दिसत आहे.