राज्यपाल रमेश बैस 'या' तारखेला नाशिक दौऱ्यावर

राज्यपाल रमेश बैस 'या' तारखेला नाशिक दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे गुरुवारी (दि.१२ ऑक्टोबर) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सर्व शासकीय यंत्रणांनी राजशिष्टाचाराचे पालन करून नियोजन करावे. यासोबतच आवश्यक माहिती विहित नमुन्यात वेळेत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की,राज्यपालांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने नियोजित हेलिपॅड, शासकीय विश्रामगृह, व दौरा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. वाहतुक व्यवस्थेचेही सुयोग्य नियोजन करण्यात यावे.

त्याचप्रमाणे राज्यपालांच्या ताफ्यातील वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी करून ती सुस्थितीत असल्याची खात्री करावी, शासकीय विश्रामगृह, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या ठिकाणी राज्यपाल रमेश बैस यांची भेट प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणीही सुरक्षा व इतर बाबींच्या व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावयाचे आहे.

राज्यपाल पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, हर घर जल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, प्रधानमंत्री किसान योजना, कृषि योजना, शाळा इमारत, डिबीटी प्रदान लाभ योजना त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आश्रमशाळा, अंगणवाडी यांचा आढावा घेणार आहेत. त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी याबाबतची माहिती सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शर्मा यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात राज्यपालांच्या प्रस्तावित दौरा कार्यक्रमाबाबत पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा,

यासोबत, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, उपवनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, उपवनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव,महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, तहसिलदार महसुल परमेश्वर कासुळे, दिंडोरी तहसिलदार पंकज पवार, येवला तहसिलदार शरद घोरपडे, त्र्यंबकेश्वर तहसिलदार श्वेता संचेती यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com