सहकार उर्जीतावस्थेसाठी सरकार प्रयत्नशील- पालकमंत्री भुजबळ

पेशवे पतसंस्था नुतन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन
सहकार उर्जीतावस्थेसाठी सरकार प्रयत्नशील- पालकमंत्री भुजबळ

डुबेरे । वार्ताहर Sinnar / Dubere

सहकार क्षेत्राला ( co-operative sector )उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Chhagan Bhujbal )यांनी केले.

येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थेच्या(Shrimant Thorale Bajirao Peshwa Nagari Sahakari Patsanstha ) नुतन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

माजी आमदार राजाभाऊ वाजे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर आमदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, उदय सांगळे, संस्थेचे चेअरमन नारायण वाजे, व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे, तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अंबादास वाजे, सरपंच अर्जुन वाजे, प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे उपस्थित होते. राज्यातील अनेक सहकारी बँका बुडाल्या आहेत. त्यामध्ये अशा काही बँका टिकल्या ज्या चांगल्या काम करताय, याचा आनंद आहे.

मात्र, सहकारी बँकांवर अशी वेळ का येते याचाही अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. सिन्नरलाही बंद पडलेल्या दिनदयाळ पतसंस्थेला राजेंद्र जगझापांनी उर्जितावस्था आणली. इतर संस्थामध्येही तसे प्रयत्न व्हायला हवेत. ज्यांना पत नाही, त्यांची पत निर्माण करण्याचे काम श्रीमंतसारख्या ग्रामीण भागातील पतसंस्थांनी केले आहे. या पतसंस्था टिकल्या पाहिजेत यासाठी संचालक मंडळाने आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडली पाहिजे.

राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरु असून यशस्वीपणे कारखाने चालविणारी चांगली माणसे भेटली पाहिजेत असे ते म्हणाले. दमणगंगा, एकदरे, कडवा, देवनदी प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला असून या योजनेद्वारे 7 टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी 1600 कोटी रुपये खर्च येणार आहे. यातून सिन्नर तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आल्याचे ना. भुजबळ म्हणाले.

कुठलाही राजकीय वारसा अगर आर्थिक पाठबळ नसतांना 30 वर्षांपूर्वी शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येत मेहनतीच्या जोरावर संस्था वाढवली. सहकारात काम करणे खूप अवघड असतानाही संस्थेने आर्थिक प्रगती तर केलीच, शिवाय सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, क्षेत्रातही भरीव कार्य केले असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे राजाभाऊ म्हणाले. सहकाराच्या माध्यमातून सामान्यांचा विकास व्हावा हे स्वप्न स्व. वसंतराव नाईक यांनी पाहिले होते. ‘श्रीमंत’ चा कारभार पाहिल्यानंतर त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरल्याचं दिसून येत आहे.

राजकारणी लोकांना सहकारात काम करणं खूप अवघड आहे. आज सहकाराचे कंबरडे मोडले असताना श्रीमंतची घौडदौड वाखाणण्याजोगी असल्याचे आ. कोकाटे म्हणाले. राज्याला व जिल्ह्याला आदर्श वाटावा असा कारभार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेने केला असल्याचे सांगळे म्हणाले. संस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण वाजे यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुत्रसंचलन प्रा. एकनाथ माळी यांनी केले. आभार व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जनसंपर्क संचालक शंकरराव वामने, कार्यकारी संचालक भिमराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अयुब शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश कुटे, संचालक काशीनाथ वाजे, आनंदा सहाणे, गोरख ढोली, गणेश वाजे, अ‍ॅड. प्रदीप वारुंगसे, विष्णू भालेराव, पोपट रहाटळ, म्हसू पवार यांच्यासह संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

मागणी येताच टँकर द्या

तालुक्यात सध्या दुष्काळाची भयावह परिस्थिती आहे. त्यामूळे सर्वसामांन्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्यास कागदपत्रांच्या फेर्‍यात न अडकवता त्यांना तात्काळ टँकर ( Water Tanker ) उपलब्ध करुन देण्याची सुचना ना. भुजबळ यांनी प्रांतधिकार्‍यांना केली. समृध्दी महामार्गामुळे तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. त्यामूळे अपघातांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आल्या आहेत. खराब झालेले हे रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात येतील असे ना. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com