असा घ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याचा लाभ

असा घ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याचा लाभ

नाशिक । प्रतिनिधी

शेती व्यवसाय करतांना विविध प्रकारचे अपघात होण्याची शक्यता असते. शेतकऱ्याला शेतात कष्टाने कामे करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे इजा झाल्यास अथवा त्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. या संकटातून सावरण्यासाठी आणि त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ७ एप्रिल २०२१ते ६ एप्रिल २०२२ कालावधीत राबविणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्ही. एस. सोनवणे यांनी दिली...

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपनीकडे विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. तसेच यापुर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीने किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागु केली असल्यास किंवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काहीही संबंध असणार नाही.

या योजनेंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील. तथापि सदर योजनेंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांने किंवा शेतकऱ्याच्या कुंटुबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजेनचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंड शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत पात्र ठरणार नाहीत.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसुल नोंदीनुसार विमा पॉलीसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला १० ते ७५ वयोगटातील कोणताही एक सदस्य यामध्ये आई-वडील, शेतकऱ्याची पती, पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती पात्र असणार आहे.

योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दोन लाख रुपये व अपंगत्व आल्यास रुपये एक लाख नुकसान भरपाई दिली जाते.

विमा दावा अर्जासोबत विहीत नमुन्यातील पूर्वसूचना अर्ज, पुर्वसुचनेसोबत आवश्यक कागदपत्रे ७/१२ उतारा, मृत्यु दाखला, प्रथम माहीती अहवाल, विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यु, पाण्यामध्ये बुडून मृत्यु, उंचावरून पडून झालेला मृत्यु, सर्पदंश, विचूदंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहीती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, वयाचा दाखला , ६-क, ६-ड आदि कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.

तसेच विमा दावा दुघर्टनेनंतर ४५ दिवसाच्या आत प्रस्ताव तयार करून तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावा. याबाबत मार्गदर्शनासाठी व प्रस्तावाच्या माहीतीसाठी आपले गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक , मंडळ कृषि अधिकारी या तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्ही. एस. सोनवणे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com