शेतकर्‍यांना सुगीचे दिवस येणार : संभाजीराजे

पळसेतील गुळ प्रकल्प गळीत हंगामाचा शुभारंभ
शेतकर्‍यांना सुगीचे दिवस येणार : संभाजीराजे

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

धनदांडग्या व्यक्तीच कारखाने सुरु करु शकतात, या धारणेला छेद देत सामान्य शेतकर्‍यांनी एकत्र येऊन उभा केलेला गुळाचा कारखाना म्हणजे शेतकर्‍यांच्या विकासाची खरी नांदी आहे. शेतकर्‍यांनी एकत्र येऊन शेतीपूरक उद्योगधंदे सुरु करुन प्रगती साधावी. सरकारने या बाबतीत निश्चित धोरण स्वीकारून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना सबसिडी देऊन त्यांना टॅक्स मध्येही सवलत दिली तर आगामी काळात शेतकर्‍यांना सुगीचे दिवस येतील, असा विश्वास युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केला.

पळसे येथील नाशिक हनीबी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या गोडवा गुळ प्रकल्पाच्या दुसर्‍या गळीत हंगामाचा शुभारंभ छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या हस्ते करण्यात आला. ते म्हणाले की, बळीराजाचे प्रश्न सोडवले पाहिजेत असे सर्वच राजकीय पक्ष सांगतात. पण त्याबाबत ठोस निर्णय कुणी घेत नाही. परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पण विमा कंपन्या नुकसान भरपाई देताना अनेक जाचक अटी लादतात. त्यामुळे नुकसान होऊनही भरपाई मात्र मिळत नाही.

सरकारने अशावेळी शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. पण मुंबई दिल्लीत बसून याबाबत निर्णय घेता येणार नाही, असे सांगतानाच कांदा, कापूस, ऊस या घाऊक पिकांसाठी आंदोलनं होतात पण भाजीपाला आणि कमी प्रमाणात घेत असलेल्या पिकांसाठी आंदोलनं होत नाहीत. अशावेळी हमीभाव देणं हे सरकारचं काम आहे.

नाशिक हनीबी फार्मर प्रोड्युसर कंपनीचा (Nashik Honeybee Farmer Producer Company) गुळ प्रकल्प उभारताना 52 लाख रुपये जीएसटी भरावा लागत असेल तर ही बाब शेतकर्‍यांसाठी निश्चितच परवडणारी नाही असेही संभाजीराजे म्हणाले. आगामी काळात शेतकर्‍यांच्या या उद्योगाला भरभराटी येऊन कंपनी सीएसआर निधी निर्माण करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी कंपनीचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे यांच्या हस्ते संभाजीराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व गरीब विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. शितल गायधनी व मनिषा मंडलिक यांनी सुत्रसंचलन केले.

यावेळी संपन्न झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आत्मा नाशिकचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, सीए उल्हास बोरसे, पळसे सरपंच प्रिया गायधनी, करण गायकर, गणेश कदम, पल्लवी मोरे, अविनाश गायकर, संजय तुंगार, राजाराम गायधनी, विकास भागवत, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, उपसरपंच दिलीप गायधनी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com