काँग्रेसला मनपात ‘अच्छे दिन’?

काँग्रेसला मनपात ‘अच्छे दिन’?

नाशिक । विजय गिते Nashik

नाशिक महापालिका निवडणुकीचा NMC Elections बिगुल लवकरच वाजणार असून त्याचे पडघम सुरू झाले आहेत.निवडणुकीचा खरा माहोल आणि राजकीय चित्र प्रभाग रचनेनंतर अधिक स्पष्ट होत जाईल.निवडणुकीपूर्वीचा माहोल तयार करण्याचे काम अगदी छोटे पक्ष,प्रादेशिक पक्ष ते राष्ट्रीय पक्षांनी सुरू केले आहे. यामध्ये काँग्रेस Congress पक्षही कमी नाही.काँग्रेसने तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्राउंड सर्व्हे केला असून,त्यात नाशिक महापालिकेत पक्षाला अच्छे दिनचे संकेत वर्तविण्यात आले आहेत.

लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकीत पक्षाला 20 ते 25 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.त्यामुळे हा सर्व्हे म्हणजे पक्ष कार्यकर्त्यांना मिळालेला एक प्रकारे बूस्टर डोसच म्हणावा लागेल.दरम्यान, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीचा भिजत पडलेल्या घोंगड्याचा प्रश्न प्रथम सर्वसंमतीने सोडाविण्याचे आव्हान पक्ष श्रेष्टींसमोर आहे.

नाशिक महापालिकेची निवडणुकीत ‘कांटे की टक्कर’ होणार यात शंका नाही.काहीही होवो सत्ता हस्तगत करायचीच असा निर्धार राजकीय पक्षांनी केला आहे.अशा परिस्थितीत नाही स्वबळावर किमान सत्तेतील भागीदारीसाठी का होईना काँग्रेस स्वप्न पाहत आहे. नाही म्हणायला काँगेसनेही स्वबळाचा नारा दिला आहे. एकेकाळी स्वबळावर मनपावर एकहाती सता मिळविणार्‍या काँगेसने स्वबळाचा नारा देण्यामागेही काही कारण आहे.मनपाता सध्या असलेल्या अवघ्या अर्धा डझन नगरसेवकांची संख्या दोन डझनवर नेण्याचे स्वप्न काँग्रेस पाहत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ग्राउंड सर्व्हे केला असून,त्यात नाशिक महापालिकेत पक्षाला अच्छे दिन चे संकेत वर्तविण्यात आले आहेत.या निवडणुकीत पक्षाला 20 ते 25 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.निवडणुकीच्या आधी पक्षाकडून आणखी दोन सर्व्हे केले जाणार आहेत. जागांमध्ये वाढ होण्यासाठी मैदानात उतरून कामाला लागा, असा सल्ला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे.राजकीय पक्षांकडून जनतेचा कल समजून घेण्यासाठी सव्र्हेचा आधार घेतला जात आहे.

महाविकास आघाडीमुळे काँग्रेसला सत्तेचा बूस्टर डोस मिळाला असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने केंद्रीय स्तरावरील एजन्सीकडून जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी सर्व्हे केला आहे. त्यात नाशिक महापालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी उंचावण्याचे संकेत आहेत. काँग्रेस स्वबळावर लढली तर 20 ते 25 जागा जिंकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.त्यामुळे निवडणुकीपूर्वी का होईना कार्यकर्ते जोमात आहे.

घर वापसी होणार ?

पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांपैकी अनेक जण पुन्हा पक्षाचा ’हात’ धरण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांपैकी काहींनी काँग्रेसचे जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन पक्षप्रवेशासाठी चाचपणी केली आहे. अनेक नगरसेवक कुंपणावर असून, टायमिंग साधत काँग्रेसचा हात पुन्हा धरू शकतात, अशी चर्चा आहे.नगरसेवकांचा एक मोठा गट पक्षाबाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अजून तरी पक्षांतराला सुरुवात झाली नसली, तरी काँग्रेसमध्येही प्रवेशासाठी महसूलमंत्री थोरात यांच्याशी संपर्क साधत पक्षप्रवेशासाठी चाचपणीसाठी अनेक जण रांगेत आहेत.

नगरसेवक मुशीर सय्यद हे काँग्रेसवासी झाले असून उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, दिनकर पाटील, लता पाटील आदी नगरसेवक पुन्हा काँगेसवासी होणार असे सांगितले जात आहे. गुरमित बग्गा यांनी अपक्ष नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये घरवापसी केली. थोड्या दिवसांत अपक्ष नगरसेवक विमल पाटील यादेखील येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात काँग्रेस सोडून गेलेले अनेक जण घरवापसीसाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.घर वापसीमागील कारण म्हणजे सध्या काँग्रेस राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा काँग्रेस जवळची वाटू लागली आहे. त्यामुळे निवडणूक जशीजशी जवळ येत जाईल तसे अनेक जण पुन्हा काँग्रेसमध्ये दिसतील, असे चित्र पाहायला मिळू शकते.

बग्गाच कसे सक्षम

गुरूमित बगा यांनी दिलेला अपक्ष नगरसेवकपदाचा राजीनामा आणि मुंबईकडे घेतलेली धाव यांमुळे काँग्रेसला दिवाळीपूर्वीच नवीन शहराध्यक्ष मिळेल, अशी जोरदार चर्चा होती.मात्र, पुन्हा एकदा काँग्रेसला शहराध्यक्ष मिळण्याची अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. बग्गा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होईल. अगोदरच प्रदेश कार्यकारिणीवरील नियुक्त्यांवरून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याने सध्या नवा वाद नको, असे म्हणून शहराध्यक्ष पदाची घोषणा लगेच नको, अशी भूमिका प्रदेश नेत्यांनी घेतल्याचे समजते.बग्गा यांचा राजकीय प्रवास हा फ्लाइंग शीख’ सारखाच आहे.

महापालिकेतील अनुभवी व अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख समस्त नाशिककरांमध्ये आहे.पक्षप्रवेश सोहळ्यातच त्यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ घातली जाईल, अशी चर्चा होती. पण पक्ष प्रवेशाच्या वेळी छाजेड सोडले, तर इतर पदाधिकारी या सोहळ्यापासून दूर होते. पक्षातील एका गटाने बग्गा यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत केले असले, तरी शहराध्यक्ष पदाला विरोध आहे. काँग्रेसला शहराध्यक्ष निवडण्यासाठी आणखी किती वेळ लागेल माहीत नाही? परंतु, हा प्रश्न श्रेष्टींना लवकरात लवकर आणि सामंजस्याने सोडवावाच लागणार आहे. हे आव्हान श्रेष्टींसमोर आहे.नाशिक शहर व जिल्ह्यातही काँग्रेसची अवस्था दयनीय आहे.अशा परिस्थितीत शहरात पक्षाला नाही पुनरवैभव किमान अच्छे दिन येण्यासाठी गुरुमित बग्गा हेच शहराध्यक्ष म्हणून पक्षाला चांगले दिवस आणून देऊ शकतात,अशी चर्चा स्वपक्षातीलच नव्हे तर इतर पक्षातील नेते कार्यकर्त्यांमध्ये आहे.

युवकांचा असाही फायदा

युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे.पदाधिकारी निवडीसाठी सभासदांना यंदा ऑनलाइन पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.त्यामुळे जो उमेदवार अधिकाधिक युवक जोडेल, तो निवडणूक जींकणार आहे.त्यामुळे सभासद संख्या वाढणार असून त्याचा फायदा निश्चितच नाशिक मनपा निवडणुकीत पक्षाला होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com