घंटागाडीत कचऱ्यासोबत गेलेली सोन्याची अंगठी सापडते तेव्हा...

घंटागाडीत कचऱ्यासोबत गेलेली सोन्याची अंगठी सापडते तेव्हा...

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये नेहमीप्रमाणे घंटागाडी कचरा संकलनासाठी आली होती. येथील एका महिलेकडून घाईगडबडीत सोन्याची अंगठीही कचऱ्याच्या डब्ब्यात टाकून दिली होती. मात्र, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही अंगठी मिळून आल्याने महापालिका कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे....

अधिक माहिती अशी की, नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक 02 मधील नांदुर गाव, निसर्ग नगर येथे केरकचरा संकलनाकरीता महानगरपालिकेची घंटागाडी नेहमी प्रमाणे गेली होती.

या परिसरातील नागरीकांनी घंटागाडीत कचरा जमा केला. त्यापैकी शिला भालेराव यांनी देखील घरातील कचरा घंटागाडीत देऊन त्या घरी परतल्या. काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की, त्यांची सोन्याची अंगठी घरात आढळून आली नाही. त्यांनी शोधाशोध केली. तथापि, अंगठी न सापडल्याने त्यांना असे वाटले की, कचऱ्यात अंगठी गेली असावी.

त्यांनी तातडीने या प्रभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता मुकादम बाळू रखमाजी जगताप यांच्याशी संपर्क साधला. सोन्याची अंगठी कचऱ्यात गेली असावी अशी शक्यता बोलून दाखविली.

यानंतर जगताप यांनी तात्काळ या घंटागाडीची ट्रॅकिंग करून घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना घंटागाडी हजेरी शेडवर घेऊन येण्यास सांगितले. घंटागाडी वाहन आल्यानंतर कचऱ्याची तपासणी करून या महिलेने दिलेल्या कचऱ्याच्या पिशवीची ओळख पटविण्यात आली.

या पिशवीतील कचरा बाहेर काढला असता त्यात सोन्याची अंगठी आढळून आली.यानंतर ओळख पटवून ही सोन्याची अंगठी भालेराव यांना सुपुर्द करण्यात आली.

नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी जगताप यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे एका महिलेस तिची सोन्याची अंगठी परत मिळाली. या घटनेची दखल घेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड यांनी जगताप यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com