गोल्ड मेडॅलिस्ट देतायेत बिटको हॉस्पिटलमध्ये सेवा

गोल्ड मेडॅलिस्ट देतायेत बिटको हॉस्पिटलमध्ये सेवा

नाशिकरोड | प्रतिनिधी

करोनाचा नवा घातक विषाणू रोज हजारो बळी घेत आहे. सगळे जण त्याच्यापासून दूर पळत असताना एचपीटी-आरवायके मधील मायक्रोबायोलॉजिच्या सुवर्णपदक विजेत्या प्रा. डॉ. स्वाती पदमाकर भावसार या राक्षसाला दररोज टक्कर देत आहेत.

सकाळी ऑनलाईन लेक्चर घेऊन त्या नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयातील प्रयोगशाळेत रात्री आठपर्यंत सेवा देत आहेत. आरटीपीसीआरने करोनाच्या तीन जीन्सची त्या खात्री करतात. जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवतात.

बिटकोतील रुग्णांचे करोना सॅम्पल औरंगाबादला पाठवले जात असे. आता बिटकोतच लॅब सुरु झाल्याने मोलाचा वेळ वाचत आहे. करोना सॅम्पल आल्यावर डॉ. गणेश गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्वाती भावसार आणि 25 सहकारी आधुनिक मशिनच्या मदतीने करोनाची खात्री करतात.

अॅनालिसिस करुन 24 तासातच रिपोर्ट देतात. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य होते. बिटकोत दिवसाला एक हजार सॅम्पल तपासले जातात. हे काम अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. यामध्ये करोना संसर्गाचा धोका असतो.

डॉ. स्वाती भावसार यांनी सांगितले की, अगोदरचा विषाणू हा वस्तू किंवा स्पर्शाव्दारे शरीरात प्रवेश करत होता. नवीन विषाणू खूप घातक असून तो हवेतून नाका-तोंडात प्रवेश करतो. लवकर सापडत नाही.

परिस्थितीनुसार स्वतः बदल करतो. लक्षण समजत नसल्याने त्याच्यावर उपचार अवघड झाले आहेत. लक्षण दिसेपर्यंत सुपर स्प्रेडर हा विषाणू अनेकांपर्यंत पसरवतात. त्यामुळे करोना सुनामीची लाट आली आहे.

हा विषाणू फुफ्फुसात गेल्यावर प्रजा वाढवतो. फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे फुफ्फुसाची ताकद वाढविण्यासाठी प्राणायाम, भस्त्रिका, अनुलोम-विलोम करावे. दीर्घ श्वास घेऊन हळू सोडावा. हिरव्या पालेभाज्या खाव्यात. दर्जेदारच मास्क वापरावेत. कोविड लस घेतल्यानंतरही दक्षता घ्यावी. गर्दीत जाऊ नये.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com