
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी (88) यांचे मध्यरात्री पावणेदोन वाजता निधन झाले. डॉ. मो. स. गोसावी यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्रातील महर्षी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे...
सामाजिक विकासासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे, हा विश्वास ठेवून त्यांनी स्वतःला शिक्षणाच्या प्रचार–प्रसारासाठी आजीवन वाहून घेतले होते. शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
जगातील सर्वात कमी वयाचा महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून त्यांची आजही नोंद कायम आहे. सरांचा श्रीमद्भगवद्गीतावर नितांत श्रद्धा व प्रचंड असा अभ्यास होता. सर योग, उपनिषद व त्यातील उदाहरण कायम आपल्या लेखात, भाषणात सहज सुलभतेने सुंदर प्रकारे समजून सांगायचे किंवा मांडायचे. गीता, ज्ञानेश्वरीवर सरांनी पुस्तक लिहिले आहे.
सरांनी मास्टर कोर्सवर लिहिलेली कितीतरी पुस्तके वेगवेगळ्या विश्वविद्यालयात शिकवली जातात. सरांनी त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या वेळेस खूप माहिती विषद केली होती. सरांनी आपल्या जीवनात कित्येक विद्यार्थ्यांच्या पिढ्यांना सक्षम करून राष्ट्र उभारणीस व त्यांच्या कुटुंबियांना पायावर उभे केले.
त्यांचे पार्थिव सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत बी.वाय.के.महाविद्यालयालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर त्यांच्यावर आज सायंकाळी 5.30 वाजता वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्च्यात मुले शैलेश आणि कल्पेश आणि तर कन्या डॉ. दीप्ती देशपांडे असा परिवार आहे. रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.