आदिवासींना बांधवाना खावटी योजनेचा लाभ द्या

आदिवासींना बांधवाना खावटी योजनेचा लाभ द्या

निफाड । प्रतिनिधी Niphad

तालुक्यातील अनेक आदिवासी( Tribals ) बांधव हे खावटी योजनेपासून ( Khawti Yojana ) वंचित राहिले आहेत. तसेच अनेक कुटुंबांकडे रेशनकार्ड व विभक्त कुटुंब दाखला नाही. अशा सर्व आदिवासी बांधवांचा खावटी योजनेत समावेश करावा अशा मागणीचे निवेदन कारसूळचे( Karsul ) माजी उपसरपंच देवेंद्र काजळे यांनी प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे, नायब तहसीलदार कल्पना निकुंभ, गटविकास अधिकारी संदीप कराड यांना दिले.

गेल्या दोन वर्षांपासून देशभरात करोनामुळे लॉकडाऊन झाल्याने अनेकांचे रोजगार गेले आहेत. हातावर पोट असणार्‍यांना तर दररोजच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने खावटी योजना सुरू करून या योजनेत किराणा वस्तूसह बँक खात्यावर 2 हजार रु. जमा करण्यात येत आहे.

मात्र यातही ज्या आदिवासी बांधवांनी फॉर्म भरले त्यात तांत्रिक चुका असल्याने त्यांची नावे या योजनेत समाविष्ट झाली नाही. एकट्या कारसूळ गावाचा विचार करता येथे 109 कुटुंबियांचा सर्व्हे झाला होता. मात्र यात फक्त 70 कुटुंबांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थी यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे शासनाने खावटी योजनेसाठी गावपातळीवर कुटुंबनिहाय सर्व्हे करुन या योजनेत वंचित राहणार्‍या आदिवासी बांधवांना देखील सामावून घेण्यात यावे. तसेच जे आदिवासी कुटुंब कुटुंबातून विभक्त राहत आहे परंतु त्यांचे रेशनकार्ड एकत्रित असल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानापासून वंचित रहावे लागत आहे अशा आदिवासी बांधवांना देखील या योजनेत सामावून घ्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अपात्र आदिवासींनाही लाभ मिळावा

तालुक्यात बहुसंख्य आदिवासींना जमिनी नाही. त्यातच करोना परिस्थितीमध्ये रोजगार देखील कमी झालेला आहे. त्यामुळे त्यांचेसाठी ही योजना देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील आदिवासींना खावटी अनुदान योजनेत किट वाटप सुरू झाले आहे. यातही अनेक पात्र लाभार्थ्यांनी फॉर्म भरुनही त्यांचे नाव यादीत आलेले नाही. आतापर्यंत जे वाटप झाले त्यात साधारणपणे 25 टक्के आदिवासी या योजनेपासून वंचित राहतील अशी परिस्थिती आहे.

राजाराम शेलार, माजी नगराध्यक्ष (निफाड)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com