भक्ती करताना परंपरेला व नित्यनियमांना सर्वोच्च स्थान द्या: शांतीगिरी महाराज

भक्ती करताना परंपरेला व नित्यनियमांना सर्वोच्च स्थान द्या: शांतीगिरी महाराज

ओझर। वार्ताहर | Ozar

निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांनी (Janardhan Swamy Maungiri Maharaj) आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी दिले. असंख्य भाविकांच्या जीवनाला योग्य दिशा देऊन त्यांना सद्मार्गावर आणले.

अशा महान शिवयोगी बाबाजींची भक्ती करतांना त्यांनी सुरू केलेल्या विविध परंपरेला व नित्यनियमांना सर्वोच्च स्थान द्या आणि परमपूज्य बाबाजींनी आपल्यावर केलेल्या अनंत उपकरातून ऋणातून उतराई होण्यासाठी सद्गुरूंचे सेवा कार्य तळमळीने करा असे प्रतिपादन निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरी महाराज (Sadguru Swami Shantigiri Maharaj) यांनी केले आहे.

कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या 33 व्या पुण्यस्मरणार्थ उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत ओझर येथील देवभूमी जनशांती धामात आयोजित राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याची सांगता अभिषेक पूजन, संत-अतिथी-ब्राह्मण पूजन, पाद्यपूजन आणि लक्षवेधी पालखी मिरवणुकीने (palkhi procession) फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जय बाबाजींच्या प्रचंड जयघोषात मोठ्या उत्साहपूर्ण, भक्तीपूर्ण वातावरणात करण्यात आली. यावेळी शांतीगिरी महाराज बोलत होते.

पहाटे 4 वाजता परमपूज्य बाबाजींच्या श्रीमूर्तीचा व भगवान बाणेश्वराचा महाअभिषेक संपन्न झाला. पहाटे 5 वाजता नित्यनियम विधी, महाआरती, सत्संग संपन्न झाला. यावेळी उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज हजारो भविकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘गुरुसेवेचा आनंद मोठा, नाही आनंदाला तोटा’ अंतःकरणापासून बाबाजींचे सेवाकार्य केल्यास विशेष आनंदाची प्राप्ती होते. बाबाजींचे आपल्यावर अनंत उपकार असून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी बाबाजींनी सुरू केलेले नित्यनियम व त्यांच्या परंपरेला विशेष महत्व द्या.

बाबाजींच्या परंपरा समाजासाठी वरदानकारी आहे. केवळ संसारातच आसक्त राहू नका. मनुष्य जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी सांगितले की, वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत श्री हनुमानाचा आदर्श घेऊन ब्रह्मचारी रहावे. 50 वर्षांपर्यंत भगवान श्रीरामाचा आदर्श घेऊन भागवतभक्ती करत संसार करावा. वयाच्या 75 व्या वर्षी संसारातील माया कमी करण्याचा प्रयत्न करून अधिकाधिक भक्ती करावी. त्या पुढे संन्यास आश्रमाचे नियम पाळावे. यावेळी त्यांनी अवधुतांनी 24 गुरू का केले त्याची माहिती दिली.

त्याज्य आणि ग्राह्य याविषयी मार्गदर्शन केले.‘ज्याचा घेतला गुण तो गुरू केला मी जाण’ ज्याचा पाहुनी अवगुण तो मी सांडीला जाण’ याचसाठी अवधुतांनी 24 गुरू केले. भाविकांनी दुर्लभ असलेल्या मनुष्य जीवनाच्या सार्थकतेसाठी चोवीस गुरूंमधील कपोत-कपोतीच्या उदारणावरून संसारातील आसक्ती कमी करत भगवतभक्ती साधावी. भागवत म्हणजे बाबाजी आणि बाबाजी म्हणजेच भागवत असे सांगत भाविकांनी एकनाथी भागवत ग्रंथ रोज नित्यनेमाने वाचावा. कारण जीवन कसे जगावे हे भागवत ग्रंथ शिकवतो.

जीवनातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर भागवत ग्रंथात आहे असेही शांतीगिरीजी महाराज यांनी सांगितले. यावेळी जपानुष्ठानात सहभागी झालेल्या हजारो भाविकांच्या मौनव्रताची सांगता, महायज्ञाची पूर्णाहुती यावेळी करण्यात आली. स्वरसिंधुराचे संचालक राहुल शिंदे यांनी सुमधूर भक्तिगीते सादर करून भाविकांचा उत्साह वाढवला. सूत्रसंचालन जिल्हा सेवक राजाराम पानगव्हाणे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम समिती, सल्लागार समिती, जिल्हासेवक, तालुका सेवक, गावसेवक, विश्वस्त, आश्रम कमिटी, महिला भक्त समिती आणि जय बाबाजी भक्त परिवारातील भविकांनी परिश्रम घेतले. पुण्यस्मरणानिमित्त जगदगुरू बाबाजींच्या दर्शनासाठी हजारो भविकांनी मोठी गर्दी केल्याने जनशांती धामास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com