सायंकाळी दूध विक्रीची परवानगी द्या!

सायंकाळी दूध विक्रीची परवानगी द्या!

नाशिकरोड | प्रतिनिधी

नाशिक रोड परिसरातील दुध विक्रेत्यांना सकाळी साडेसहा ते साडेआठ व सायंकाळी चार ते सहापर्यत दुध विक्रीस परवानगी द्यावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पोलिस आयुक्त दिपक पांडे यांच्याशी चर्चा केली. याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी दिले.

करोनांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकरोड परिसरात जनता कर्फ्यु सुरु आहे. दुध विक्रीला सकाळीच परवानगी आहे. त्यामुळे सायंकाळी नागरिकांचे हाल होतात तर नाशिकरोडबरोबरच शहरातील दूध व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. नाशिकरोडचे दुध व्यावसायिक मंगेश खालकर यांनी खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन दिले. गोडसे यांनी त्वरीत पोलिस आयुक्त दिपक पांडे यांच्याशी चर्चा केली.

दुध विक्रीस सकाळी साडेसहा ते साडेआठ व सायंकाळी चार ते सहापर्यंत किरकोळ विक्रीस व घरोघरी जाऊन देण्यास परवानगी द्यावी. करोनाबाबतच्या नियमांचे पालन दुध विक्रेते करतील, असे गोडसे यांनी आयुक्त पांडे यांना सांगितले. यावर आयुक्तांनी दोन दिवसांत निर्णय घेऊ असे सांगितले.

मंगेश खालकर म्हणाले की, गाय व म्हशीचे सकाळ आणि सायंकाळी दुध घेतले जाते. दुध हे नाशवंत असल्याने ते त्याच दिवशी ग्राहकांना द्यावे लागते. आज दुध विक्रेत्यांनाकडे सायंकाळी दुध साठविण्यासाठी यंत्रणा नाही.

त्यामुळे हे त्याच दिवशी ग्राहकांना पोहचवणे गरजेचे आहे. दुध साठवून ठेवले तर खराब होते. त्यामुळे सायंकाळीही विक्रीची परवानगी मिळणे आवश्यक आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com