कमी पीककर्ज वाटप केलेल्या बँकांना नोटीसा द्या
नाशिक

कमी पीककर्ज वाटप केलेल्या बँकांना नोटीसा द्या

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा आदेश

Kundan Rajput

नाशिक । दि.६ प्रतिनिधी Nashik

खरीप हंगामाला दोन महिने लोटले असून अद्याप शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाचा दर अत्यंत कमी आहे. एकूण ३ हजार ३०० कोटी वाटपाचे उदिष्ट होते. त्यापैकी ५० टक्के कर्ज देखील वाटप झाली नाही. ज्या राष्ट्रीयकृत बँका , खासगी, व्यापारी बँका यांनी खरीप पीककर्ज वाटपात टाळाटाळ केली त्यांना नोटिसा पाठवून खुलासा मागवा, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीपपीक आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यात ३९ हजार ५९९ शेतकऱ्यांना १ हजार २०९ कोटी रुपयांचेच के खरीप पीक कर्ज वाटप झाले आहे. जिल्ह्यास ३३०० कोटींचे उद्दीष्ट असताना हे वाटप अत्यंत तोकडे असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि पुढील आठवड्यापर्यंत यात ३०० कोटींची वाढ करण्याचे आदेशही दिले.

तसेच मागील वर्षी सन २०१९-२० या वर्षात ज्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना कर्जवाटप केलेले आहे ,अशा शेतकऱ्यांची यादी वाढीव कर्जासाठी तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी, व्यापारी बँकांना गटसचिवांनी उपलब्ध करुन देण्याच्याही सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेन्दु शेखर, राष्ट्रीयकृत बँक , खासगी बँक, व्यापारी बँक व ग्रामीण बँकांचे विभाग स्तरावरील व्यवस्थापक ( झोनल मॅनेजर ), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते .

शेतकऱ्यांनी जुन्याची परतफेड करा

विविध सहकारी संस्था आणि बँकांचे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम भरून पुढील कर्जासाठी जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेकडे मागणी नोंदवावी. तसेच हे वाढीव कर्ज कमी व्याज दरात उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन, जिल्हाधिकार्‍यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com