निफाड । प्रतिनिधी

गेल्या दहा वर्षांत निफाड तालुक्याचा विकास थांबल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. रस्ते, वीज, पाणी यासह विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी निफाड तालुक्याला जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी आमदार दिलीप बनकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंचेकडे केली आहे.

मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अन्न नागरी व पुरवठा तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषीमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत स्नेहभोजनास निफाडचे आमदार दिलीप बनकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाशिक जिल्हा व निफाड तालुक्यातील विविध विकासकामांच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली.

आमदार बनकर यांच्या स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेने निफाड तालुक्यातील पुढील 15 वर्षांकरिता रानवड साखर कारखाना भाडेतत्वावर सुरू करणेकरिता परवानगी दिली त्याबद्दल आमदार बनकर यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले. तसेच विकासकामांवर चर्चा करताना तालुक्यातील आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्याकरिता निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये व पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करावे. तसेच रुग्णालयासाठी त्याप्रमाणात पद निर्मिती करावी.

तालुक्यातील गोदाकाठ भागात जास्तीत जास्त पर्यटक यावे व स्थानिकांना अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी याकरिता नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरात पैठणच्या धर्तीवर गार्डन निर्मिती करण्यासाठी व त्या परिसरात विविध सोई सुविधा निर्माण करण्याबाबत पत्र देत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच तालुक्याचे महत्वाचे पिक असलेले द्राक्ष बाजार भावाबाबत विविध येत असलेल्या अडचणी, केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीवर देत असलेले अनुदान बंद केले असून त्यामुळे निसर्गाशी दोन हात करत व लाखो रुपये खर्च करून पिकवलेले द्राक्ष कवडीमोल भावात विक्री करावे लागत आहे. त्यामुळे सदर बंद केलेले अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यसरकारने प्रयत्न करावे.

तसेच तालुक्यात विजेच्या वाढीव लोड संदर्भात विविध अडचणी येत असून त्या तत्काळ सोडविण्यात येऊन जास्तीचा निधी उपलब्ध करून द्यावा. कांदा बाजारभाव व शेतकर्यांच्या विविध अडचणी बाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. निफाडच्या विविध विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार बनकर यांना दिले. याप्रसंगी आमदार नितीन पवार, सुहास कांदे आदींसह जिल्ह्यातील विधानसभा सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.