नियमित परतफेड करणार्‍यांना कर्ज द्या

नियमित परतफेड करणार्‍यांना कर्ज द्या

पिंपळगाव ब.। वार्ताहर Pimpalgaon Basvant

गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती ( Natural disasters )तसेच कर्जमाफी योजनाच्या अंमलबजावणीमुळे जिल्हा बँकेची कर्ज थकबाकी ( District Bank loan arrears ) मोठ्या प्रमाणात वाढल्याने बँकेच्या अनुत्पादक कर्जात वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने कर्जवाटप बंद केले आहे. पण यात जे शेतकरी सभासदांनी कर्ज रक्कम नियमित भरली आहे त्या सभासदांना जिल्हा बँकेने त्वरित कर्जपुरवठा करावा

तसेच शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेच्या वतीने राबवण्यात येणार्‍या विविध नवीन योजनांमध्ये सहभाग घ्यावा. जुने थकित कर्जदार यांचे मोठ्या रकमेचा कर्ज वसूल करण्याकामी बँक कर्मचार्‍यांनाही सहकार्य करावे व शेतकरी हित जोपासणार्‍या जिल्हा बँकेला डबघाईस जाण्यापासून वाचवावे, असे प्रतिपादन आ. दिलीप बनकर ( MLA Dilip Bankar ) यांनी केले आहे.

येथील बाजार समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा बँक, सहाय्यक निबंधक कार्यालय, विकास सोसायटीचे प्रतिनिधी यांच्या समन्वय बैठकीप्रसंगी आ. बनकर बोलत होते. जिल्हा बँकेचे प्रशासक मुहम्मद आरिफ यांनी आपल्या मनोगतात जिल्हा बँकेची मोठ्या प्रमाणात कर्ज थकबाकी आहे. ते वसुलीसाठी प्राथमिक शेती संस्था स्तरावरील व थेट कर्जाच्या थकबाकीदार सभासदांकडील थकबाकी वसूल होणे आवश्यक असल्याने यासाठी जिल्हा बँकेने समोपचार कर्जफेड योजना कार्यान्वित केली आहे. यामध्ये जे सभासद 2016 पर्यंत थकबाकीत आहेत त्यांना व्याजामध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच जे सभासद 2017 पर्यंत थकबाकीत आहेत त्यांना व्याजात 40 टक्के सवलत दिली जाणार आहे.

जिल्हा बँकेचा नफा वाढवण्यासाठी बँकेने 11:88 टक्के व्याजदराने सोनेतारण कर्जवाटप सुरू केले आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेच्या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन आरिफ यांनी केले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे, शेतकरी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून सोमनाथ मोरे, सुरेश खोडे, नंदू सांगळे, जगनाथ कुटे, माणिक सरोदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी निफाडचे सहाय्यक निबंधक रणजित पाटील, पिंपळगाव तलाठी राकेश बच्छाव, अभिराज पाटील, बाजार समिती उपसभापती दीपक बोरस्ते, संचालक निवृत्ती धनवटे, बाळासाहेब बनकर, सुरेश खोडे, बाबासाहेब शिंदे, माधव ढोमसे, साहेबराव खालकर, विजय देशमाने, अजय गवळी, राजेंद्र बोरगुडे, भूषण शिंदे, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकरी ज्ञानेश्वर वाटपडे, केशव मोरे, चंद्रकांत बनकर,

भानुदास विधाते, दत्तात्रय आथरे, सुरेश निरगुडे, राजाराम आथरे, परशराम आथरे, प्रवीण कागदे, चंद्रकांत खोडे आदींसह विकास सोसायट्यांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, सचिव यांच्यासह पतसंस्था व विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे प्रशासक मुहम्मद आरिफ यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना सविस्तर उत्तरे देऊन उपस्थित सर्व तालुक्यातील सोसायटी पदाधिकार्‍यांचे आभार मानले.

शाखा तेथे 7/12 उतारा केंद्र

जिल्हा बँकेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सुमारे 178 शाखांमध्ये शेतकर्‍यांसाठी 7/12 उतारा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे शेतकर्‍यांची डिजिटल उतारा काढण्यासाठी होणारी परवड आता थांबणार आहे. जिल्हा बँकेने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. मात्र आता बँकेच्या अडचणीच्या काळात शेतकर्‍यांनीही बँकेला सहकार्य करणे गरजेचे आहे.

ज्ञानेश्वर वाटपडे, विभागीय अधिकारी, जिल्हा बँक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com