अर्ली द्राक्षांना विमा कवच द्या - आ. बोरसे

अर्ली द्राक्षांना विमा कवच द्या - आ. बोरसे

मुंजवाड । वार्ताहर

बागलाण तालुक्यातील अर्ली द्राक्ष पिकाला विमा कवच देण्या बरोबरच निर्यातीचे आतापासूनच नियोजन करावे जेणेकरून देशाला जास्तीतजास्त परकीय चलन मिळेल, अशी मागणी आ. दिलीप बोरसे यांनी जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत केली.

जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक करोनाची साथ असल्यामुळे ऑनलाइन पार पडली. या बैठकीस पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कृषिमंत्री दादा भुसे, विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. दिलीप बोरसे, दिलीप बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कृषी सहसंचालक संजीव पडवळ, कृषीअधीक्षक विवेक सोनवणे तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी व शेतीशी संबंधित इतर विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी ऑनलाइन पद्धतीने सभेस उपस्थित होते.

आ. दिलीप बोरसे यांनी बागलाण तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रलंबित प्रश्न मांडलेत. यामध्ये प्रामुख्याने अर्ली द्राक्ष पिकास विमा कवच देण्यात यावे, हवामान आधारित डाळिंब फळ पीक विमा योजनेतील जटिल अटी शिथिल करण्यात याव्यात, बागलाण तालुक्यासाठी कांदा चाळ, शेततळे, शेततळे अस्तरीकरण या शेतकर्‍यांच्या गरजेच्या योजना आहेत, यासाठी वाढीव लक्षांक देण्यात यावा, कृषी विभागाच्या योजना महाडीबीटी पोर्टलमार्फत राबविण्यात येत आहेत.

या पोर्टलमध्ये प्रत्येक वेळेस शेतकर्‍यांना सीएससी केंद्रावर जावे लागते तेथे कालापव्यय होतो व पैसे देखील खर्च होतात यामध्ये सुटसुटीतपणा आणावा, तालुक्यातील शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्याबाबत बँकांना सूचना देण्यात याव्यात, बागलाण तालुका हा आदिवासी तालुका आहे,यामध्ये आदिवासी बांधवांना वनपट्टे देण्यात आलेले आहेत परंतु वनपट्ट्यातील जमिनीचे क्षेत्र हे वाहितीखालील क्षेत्रांमध्ये गणली जात नाही त्यामुळे आदिवासी भागांमध्ये खताची मागणी करताना वनपट्टाधारक जमिनीचा देखील विचार करून मागणी करावी जेणेकरून हंगामामध्ये तुटवडा भासणार नाही, तसेच तालुका हा अर्ली द्राक्षपिकासाठी प्रसिद्ध आहे.

अर्ली द्राक्षामुळे देशास परकीय चलन मिळते परंतु पूर्वहंगामी द्राक्ष घेत असताना साधारणपणे जुलै ते डिसेंबर या कालावधीत करोनामुळे शेतकर्‍यांना अडचणींना सामोरे जावे लागते त्या अडचणी दूर करण्यात याव्यात अशा शेतकर्‍यांच्या हिताच्या मागण्या आ.बोरसे यांनी केल्या. पालकमंत्री भुजबळ व कृषीमंत्री भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अडचणी सोडवण्याचे आश्वासन आ. बोरसेंना दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com