
मालेगाव | सतिश कलंत्री Malegaon
रस्त्यावर प्रचंड गर्दी जमली होती. बघ्यांची संख्या वाढतच होती. एका ट्रकने कारला ठोस मारली अन् कारचा पार चेंदामेंदा झाला होता. ट्रकही पुढे जाऊन उलटला होता. अपघात घडला की फक्त गर्दी होते. पण अपघातातील लोकांना कुणी मदत करायला धजावत नाही. उलट आपल्या मोबाईलवरून शुटींग ( Shooting by Mobile ) करणारे महाभागही असतात. हा तर माणुसकी शून्य प्रकारच म्हणावा...
अपघातग्रस्त ( Accident )कारमध्ये कुणीतरी विव्हळत होतं. तोच दोन तरणेबांड तरूण त्या ठिकाणी आले. कारजवळ जाऊन आत किती व्यक्ती आहेत, त्याचा अंदाज घेतला. कारमधून त्यांना बाहेर काढणे गरजेचे होते. त्यांनी लागलीच आपल्या कारमधून टामी व इतर साहित्य काढले. पत्रा वाकवून आत अडकलेल्या जखमी व्यक्तींना बाहेर काढू लागले. इकडे बघ्यांच्या संख्येत भर पडतच होती पण त्या तरूणांना कुणी मदत करायला धजावले नाही. माणूसकी संपली होती. त्या तरूणांनी कारमध्ये अडकलेल्या चारही जणांना हळूहळू बाहेर काढलं. आधीच खूप जखमा झालेल्या होत्या.
बरचसं रक्त वाहून गेलं असावं! त्या चारही जणांना आपल्या कारमध्ये घेवून जाणं शक्य नव्हतं. कुणीतरी आपल्या वाहनात ह्यांना हॉस्पीटलपर्यंत घेवून जाईल तर ह्यांचे जीव वाचू शकतील म्हणून ते आर्त नजरेने इकडे तिकडे पहात होते. तोच एक टेम्पोवाला पुढे आला. त्याने मागे दोन जणांना घेतले. दोन जण त्या तरूणांच्या कारमधून हॉस्पीटलपर्यंत जायला निघाले. सुदैवाने हॉस्पीटल खूप लांब नव्हते. चारही जणांना लागलीच अॅडमीट करण्यात आले. त्या दोन्ही तरूणांचे कपडे रक्ताने माखले होते. उपचार सुरू झाले.
एकाच परिवारातील ही माणसं होती. नवरा-बायको व दोन मुलं असा हा संपूर्ण परिवार अपघातात सापडला होता. बराच वेळ उपचार सुरू होते. ह्यांच्या मनात धाकधूक होती की काही बरं वाईट तर होणार नाही ना? थोड्या वेळात डॉक्टर बाहेर आले अन् त्यांनी सांगीतलं की आता चौघांच्या जीवाला कोणताही धोका नाही. केवळ त्यांना वेळेवर तुम्ही दवाखान्यात आणले म्हणून त्यांचे प्राण वाचले. पाच-दहा मिनीटही उशीर झाला असता तर काहीही अघटित घडले असते. दोन्ही तरूणांनी देवाचे आभार मानले व ते तेथून जायला निघाले.
अपघात घडल्यानंतर लागलीच जर मदत मिळाली तर अनेकांचे जीव वाचू शकतात. पण आपल्यावर नंतर काही बालंट येईल म्हणून कुणी मदत करायला पुढे येत नाही. वास्तविक आता कायद्यात बदल झालेला आहे. जो कुणी अशी मदत करेल, त्याला नंतर कोणताही त्रास होत नाही. पण हे अजून जनतेला समजलेले नाही. आपल्या कुणावर असा प्रसंग आला तर? अपघातात सापडलेली माणसं आपलेच कुणीतरी जवळचे नातेवाईक आहेत, असं समजून मदत केली तर हजारोंचे जीव वाचू शकतील. त्या दोन्ही अनामिक तरूणांनी सर्वांच्या डोळ्यात अंजन घातले होते.