नाशिकरोड । Nashik

उपनगर परिसरात घरोघरी गॅस सिलेंडरचे वाटप करून एका पित्याने आपल्या मुलीला 'सी ए' (सनदी लेखापाल) केल्याने उपनगर मधील सिंधी कॉलनीत राहणारे जगवाणी कुटुंब चर्चेत आले आहे. प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांच्या हस्ते कु. पूजा दिलीप जगवाणी हिचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

जगवाणी कुटुंब हे उपनगर मधील सिंधी कॉलनीत मागील ८० वर्षांपासून राहतात. दिलीप देवनदास जगवाणी हे अनेक वर्षांपासून गांधीनगर येथील एका गॅस एजन्सी मध्ये घरगुती गॅस सिलेंडर वाटपचे काम करतात. अगोदर सायकलवर घरोघरी जाऊन सिलेंडर वाटपचे काम करायचे. घरातील परिस्थिती हलाकीचीच.

घरात चार सदस्य पत्नी माधुरी दिलीप जगवाणी या उपनगर मध्ये मिळेल ते काम करून कुटुंबाच्या घरखर्चास हातभार लावीत होत्या. मुलगा राज आणि मुलगी कु. पूजा हे दोन्ही अभ्यासात हुशार असल्याने त्यांना केवळ शिक्षणासाठी प्रेरित केले. जीवनात केलेल्या कष्टाचे फळ आज त्यांना मिळाले, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

कु. पूजा हिने प्राथमिक शिक्षण हॉलिफ्लॉवर स्कुल मधून पूर्ण केले. नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयातुन ११वी, १२वी वाणिज्य शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. पण पुढील शिक्षणासाठी 'फी' परवडत नसल्याने कु. पूजा हिने बाह्य प्रणालीने शिक्षण पूर्ण करून वाणिज्य पदवीधर झाल्या.

त्यानंतर सिपीटी परिक्षेत २०० पैकी १८५ गुण, त्यानंतर इंटर परिक्षेत संपूर्ण भारतात १६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सी ए च्या फायनल परिक्षेत देखील नाशिक जिल्ह्यात विशेष प्राविण्य मिळवून 'सी ए' (सनदी लेखापाल) पदी विराजमान झाली. कु. पूजा याचे सर्व श्रेय हे माता, पिता आणि भावाला देतात.

परिस्थितीला दोष देऊन काही अर्थ नाही. विपरीत परिस्थिती असतांना मनात ध्येय निश्चिती केल्यास मार्ग निघून सकारात्मक परिणाम पदरी येतात. हे त्याचेच फळ आहे, असे दिलीप जगवाणी अभिमानाने सांगतात.

कु. पूजा ही 'सी ए' झाल्याने उपनगर परिसराला नावलौकिक प्राप्त झाला आहे. ईतर विद्यार्थ्यांनी ध्यास घ्यावा, असे आवाहन सत्काराप्रसंगी नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांनी केले.

युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवि पगारे (सर) उपस्थित होते. यावेळी महेश बनसिंगानी, त्रिलोक कटारिया, माया रिजवाणी, नानिक केसवाणी, भाविका कुकरेजा, हेमा जगवाणी, लकी वाधवाणी, करिष्मा कुकरेजा आदी उपस्थित होते.