घोटी बाजार समिती बंदच; नियमांचे पालन करण्यास असमर्थ

खंबाळे शिवारात होतेय खरेदी विक्री
घोटी बाजार समिती बंदच; नियमांचे पालन करण्यास असमर्थ

घोटी | Ghoti

कालपासून जिल्हाभरात बाजार समित्या सुरू झाल्या असल्या तरी घोटी येथील बाजार समिती बंद आहे. कारण येथील बाजार समिती कोरोना नियमांचे पालन करण्यास असमर्थ असल्याचे सांगण्यात येत आहे.

इगतपुरी तालुक्यातील महत्वाची असलेल्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती समजली जाते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या १२ में ते २३ मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार बाजार समितीचा कारभार बंद ठेवण्यात आला होता.

परंतु २४ तारखेपासून पूर्ववत कारभार सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी काही अटी शर्तींवर सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु बाजार समिती ह्या अटी शर्ती पुर्ण करण्यास असमर्थ असल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

बाजारसमिती काही दिवस बंद राहील असे संकेत वर्तविल्या जात असले तरी घोटी जवळील खंबाळे शिवारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी - विक्री होत असून याची जबाबदारी कुणाची ? हा प्रशासकीय पातळीवर प्रश्न उभा ठाकलेला आहे. या ठिकाणी दिवसभर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होतांना सर्वत्र दिसत होते.

बाजार समितीचे मुख्य बाजार आवार घोटी शहराच्या मध्यवर्ती वस्तीत असून बाजार आवाराची जागा अत्यंत तोकडी २ एकर जागेत आहे. बाजार आवार बंधीस्त नसून गावातील अनेक नागरी वस्त्यांचे रहीदारीचे रस्ते पूर्वीपासून बाजार आवारातून आहेत.

त्यामुळे बाजार आवारामध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे, सामजिक अंतर राखणे, ऐका गेटमधून प्रवेश आणि दुसऱ्या गेट मधून बाहेर जाणे ह्या बाबीचा अवलंब करणे बाजार समितीला शक्य नाही.

बाजार समिती मध्ये पूर्वीपासून लिलाव पद्धत अवलंबली जात नाही. शेतकरी व व्यापारी यांची वटाव पद्धतीने व्यवहार होत असल्याकारणाने गर्दी टाळणे शक्य होणार नाही. या सह होणाऱ्या विविध अडचणीचें पत्र बाजारसमिती च्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

बाजार समिती मध्ये भाजीपाला शेतमालाची हंगामी आवक होत असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे अतोनात नुकसान झाले असले कारणाने आर्थिक उत्पन्न कमालीचे घटले आहे. त्यामुळे बाजारसमिती आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने कर्मचारी पथक नेमणे बाजारसमितीला शक्य होणार नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

खंबाळे शिवारात खरेदी विक्री

घोटी जवळील २ किलोमीटर अंतरावर खंबाळे शिवारात भाजीपाला खरेदी विक्री मोठया प्रमाणात होत असून या ठिकाणी मुंबई, कल्याण ठाणे, वसई, पालघर, जव्हार, या ठिकानाहून व्यापारी मोठया प्रमाणात येत असतात.

मोठ्या प्रमाणात शेती मालाची आवक - जावक होत असते. कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या आवारात खरेदी - विक्री करणे बाबत बाजारसमितीने जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे बाजारसमिती बंदच राहील असे संकेत बाजारसमितीच्या प्रशासकीय विभागाकडून वर्तविल्या गेले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com