करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

घोटीतील लॉकडाऊन रद्द

सततच्या लॉकडाऊनला घोटीकरांचा विरोध

Abhay Puntambekar

घोटी । जाकीर शेख Nashik

गेल्या दोन महिन्यांपासून घोटीत स्थानिक पातळीवर सलगच्या होणाऱ्या लॉकडाऊनमुळे किरकोळ विक्रेते, युवक,मजूर यांच्या रोजगाराचे गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. त्यातच गेल्याच आठवड्यात आठ दिवसाचा लोकडाऊन करण्यात आला ही मुदत संपताच केवळ तीन दिवस बाजारपेठ उघडी ठेऊन आज सोमवारपासून पुन्हा १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थ व विक्रेते यांच्यात नाराजीचा सूर उमटत होता.अखेर काल ग्रामस्थ , लोकप्रतिनिधी व ग्रामपालिका सदस्य यांच्यात बैठक होऊन आज सोमवार पासूनचा लॉकडाऊन निर्णय मागे घेण्यात आला.

मागील आठवड्यात शुक्रवार ते गुरुवार असा आठवडाभराचा लॉकडाऊन सुरू असतानाच तालुका पातळीवर तहसीलदारांच्या कार्यालयात बैठक घेण्यात येऊन पुढील शुक्रवार ते रविवार तीन दिवस दुकाने उघडे ठेवून पुन्हा सोमवार दि २७ ते १० ऑगस्ट पर्यंत पुन्हा लोकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात होता. या निर्णयामुळे घोटीत व तालुक्यात उलटसुलट चर्चा व्यक्त होत होती. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याऐवजी फक्त लॉकडाऊन करण्यावरच का उत्साह दाखवला जातो असा सवाल व्यक्त करण्यात येत होता.

या पार्श्वभूमीवर आज घोटीत ग्रामपालिका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यात बैठक घेऊन घोटीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केवळ लॉकडाऊन हा एकच पर्याय नाही . तर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सततच्या लॉकडाऊनमुळे सामान्य वर्गातील नागरिक, बेरोजगार युवक, मजूर वर्ग यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.

काल झालेल्या बैठकीत घोमकोचे माजी चेअरमन चांदमल भन्साळी, जि प सदस्य उदय जाधव, ग्रामपालिका प्रभारी सरपंच संजय आरोटे, ग्रामपालिका सदस्य रामदास भोर, श्रीकांत काळे, व्यापारी चंद्रभान गायकवाड, बाळू पीचा, नवीन चोपडा, रमेश परदेशी, सुजित राखेचा, हेमंत सुराणा रमेश पीचा ,विजय गोसावी, दिलीप लड्डड, आदींनी शहराच्या परिस्थितीबाबत चर्चा करून उद्यापासूनचा लॉकडाऊन मागे घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पूर्ण घोटी शहरात सर्व विभागात सॅनिटायझर करणे, शहरात स्वच्छता करणे, घोटी शहरात सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा करणे, आरोग्य विभागाची बैठक घेऊन शहरात प्रत्येक कुटुंबाची वैद्यकीय तपासणी, चाचणी करणे याबरोबरच गावात, चौकाचौकात गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, शहरात आलेल्यांच्या प्रत्येकाच्या तोंडावर मास्क असणे गरजेचे करणे, मास्क न वापरणा-यांना दंडात्मक कारवाई करणे, टवाळखोर व विनाकारण हिंडणाऱ्या तसेच कामाविरहित फिरणाऱ्या युवक, व्यक्तीवर पोलीस यंत्रणेमार्फत कठोर कारवाई करणे

करोना प्रतिबंधासाठी जनजागृती करणे तसेच दुकानदारांनी मास्क नसलेल्या ग्राहकांना माल देऊ नये, प्रत्येक ग्राहकाच्या हातावर सॅनिटायझर देणे, दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ न देणे तसेच शहरात वाहतूक कोंडी होणार नाही याची दखल घेणे याबाबतची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com