जलदगतीने कामे मार्गी लावा
नाशिक

जलदगतीने कामे मार्गी लावा

महसूलदिनी कृषीमंत्री भुसे यांचे आवाहन

Abhay Puntambekar

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

सर्व विभागांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या महसूल विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्य घेत गोरगरीब जनतेची कामे जलदगतीने कशी मार्गी लागतील, यासाठी सर्व अधिकारी, सेवकांनी संपूर्ण योगदान देत महसूलच्या नावलौकिकात अधिक भर घालावी, असे प्रतिपादन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले.

येथील प्रांत कार्यालयात महसुल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना कृषिमंत्री भुसे बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांत विजयानंद शर्मा आदींसह अधिकारी, सेवक यावेळी उपस्थित होते. न्यायिक व अर्धन्यायिक बाबींवर विहित कालमर्यादेत काम कसे होईल याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

झोपडीतील माणसाची प्रगती कशी होईल या दृष्टिकोनातून कामकाज करण्यासाठी मोठा वाव असलेला व आशिर्वादपर काम करणारा महसूल विभाग आहे. अधिकाधिक गोरगरिबांची सेवा करून त्यांना या विभागाकडून न्याय दिला जाईल, अशी अपेक्षा ना. भुसे यांनी पुढे बोलतांना व्यक्त केली.

आगामी वर्षात महसूल विभागाकडून शासनाच्या व जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प घेत त्याच्या पूर्तीसाठी परिश्रम घ्यावे व लोकाभिमुख प्रशासन यंत्रणा या प्रतिमेला अधिक उंचीवर न्यावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी केले. प्रांत विजयानंद शर्मा यांनीही अधिकारी, सेवकांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात अजंदे, भुईगव्हाणच्या तलाठी सुप्रिया जाधव यांची उत्कृष्ठ तलाठी म्हणून ना. भुसेंच्या हस्ते मानचिन्ह देण्यात येवून सन्मान करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार सोमनाथ खैरे, डी.बी. वाणी, आर.एस. वळवी, शिरस्तेदार सुर्यवंशी, मधुकर व्यवहारे, बापू जाधव आदी अधिकारी, सेवक उपस्थित होते.

महाराजस्व अभियानाचा शुभारंभ

विभागीय महसूल विभागाच्या राजस्व अभियानाचा शुभारंभ व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केला गेला. दोन हजारावर अधिकारी, सेवक त्यात सहभागी झाले. पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त राजाराम माने व विभागाच्या सर्व जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com