१०० टक्के लसीकरण करा ! १५ लाख मिळवा !

सुरगाणा तालुक्यात आमदार नितीन पवारांची पाहणी
१०० टक्के लसीकरण करा ! १५ लाख मिळवा !

कळवण | Kalwan

कोरोना या साथरोगापासून स्वतःचा व कुटुंबातील सदस्यांचा बचाव करण्यासाठी कुठलेही गैरसमज, अफवांवर विश्वास न ठेवता जास्तीत जास्त आदिवासी बांधवानी करोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, ज्या ग्रामपंचायत हद्दीत 100 टक्के कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण होईल त्या ग्रामपंचायतला विकासकामांसाठी 15 लाख रुपये उपलब्ध करुन देण्याची घोषणा आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा तालुका दौऱ्यात केली.

तौक्ते चक्रीवादळामुळे सुरगाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन फळबागांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेसमवेत नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन आदिवासी बांधवाना दिलासा दिला.

चक्रीवादळामुळे घरांचे तसेच आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्व नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची सूचना महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेला देऊन पंचनाम्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन अहवाल शासनस्तरावर सादर करण्याची सूचना यावेळी आमदार पवार यांनी केली.

सुरगाणा तालुक्यातील सुकतळे, हस्ते, सांबरखल,बरडा,दाबाडमाळ ,रोंगाणे,म्हैसमाळ, शिरीषपाडा,दांडीचीबारी, वडपाडा, माणी, खडकमाळ, पळसन, म्हैसखडक,देविपाडा, उंबरठान,मांधा पांगारणे, गोंदूणे आदी गावांमध्ये भेट देऊन नुकसानग्रस्त घर व फळबाग यांना भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.

या आदिवासी बहुल भागातील दौऱ्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतली का ? याबाबत अनेक आदिवासी बांधवाना त्यांनी विचारणा केली. अनेकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नसल्याचे आमदार पवार यांच्या निदर्शनास आले.

लसीकरणाबाबत गैरसमज व अफवा पसरविण्यात आले असून मी स्वतः लस घेतली आहे आणि तुमच्याकडे समोर जीवंत उभा आहे त्यामुळे गैरसमज करुन न घेता लसीकरण करुन घेण्याचे आवाहन आमदार पवार यांनी ठिकठिकाणी भेटीप्रसंगी केले.

सुरगाणा तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत हद्दीत १०० % लसीकरण करण्यात येईल त्या ग्रामपंचायतला विकास कामांसाठी 15 लाख रुपये निधी विकासकामासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार पवार यांनी यावेळी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com