नाशिक । प्रतिनिधी Nashik

पोलीस बांधवांनो व्यसनमुक्त होऊन आरोग्यदायी खर्या जीवनाचा आनंदा लुटा असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी येथे केले. यासह पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी रोगमुक्त करण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी नमुद केले.

पोलीस मुख्यालयातील भीष्मराज बाम बहुद्देशिय सभागृह येथे पोलीस अधिकारी, कर्मचार्यांसाठी आयोजीत सर्व रोगनिदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांच्या हस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

पांडे म्हणाले, व्यसनांमुळे अनेकदा आपणाकडून चुका घडतात. आपण ते केव्हाही केले, थोडे जरी केले तरी ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. महिलांना खूप वाटत असते आपल्या पतीने मद्यपान करू नये, तंबाखू, सिगारेट सोडावी. पोलीस अधिकारी तसेच कर्मचार्यांना व्यसन सोडण्याची इच्छा असल्यास त्यांना सर्वोतोपरी मदत आयुक्तालयांकडून दिली जाईल.

पोलीस अधिकारी, कर्मचार्यांनी करोनाला योग्यरीत्या आतापर्यंत तोंड दिले असून सध्या एकही पोलीस करोनाग्रस्त नाही. यामुळे आता आपण पोलीसांची सर्व रोगांपासून मुक्ती करण्यासाठी प्रयत्न करत असून यातूनच जिल्हा रूग्णालयाच्या सहकार्याने सर्वरोग निदान व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे आठ दिवसांच्या अंतराने मुख्यालयासह शहरातील सर्व पोलीस वसाहतींमध्ये होणार आहेत. पोलीस अधिकारी, कर्मचार्यांसह त्यांच्या कुटुंबियांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी मुंबई येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ. दिपनारायण शुक्ला, उपायुक्त अमोल तांबे, संग्रामसिंग निशानदार, विजय खरात, पौर्णिमा चौघुले - श्रींगी, डॉ. भुषण पाटील, डॉ.शंतनु झाल्टे, पोलीस रूग्णालयाचे डॉ. प्रशांत देवरे सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.