राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यास सज्ज व्हा

माजी पालकमंत्री भुजबळ यांचे आवाहन
राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यास सज्ज व्हा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ( Local Body Elections )जाहीर झालेल्या असून येणार्‍या काळात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करायचे आहे. प्रत्येक तालुका, गावे, शहर आणि वॉर्डावॉर्डातील बूथ कमिट्या मजबूत करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा, असे आवाहन करत सत्ता असो वा नसो शरदचंद्र पवार यांचे नेतृत्व अखंडितपणे उच्चस्तरावर राहील, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री छगन भुजबळ( Chhagan Bhujbal) यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ( NCP) नाशिक शहर व जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची आढावा बैठक राष्ट्रवादी भवन ( Rashtravadi Bhavan ) नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज आहिरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिवराम झोले, डॉ. सयाजीराव गायकवाड, अशोक सावंत, निवृत्ती अरिंगळे, अ‍ॅड. शिवाजी सहाणे, सचिन पिंगळे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, शहर सरचिटणीस संजय खैरनार उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, शरदचंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्यानंतर तीन ते चार चक्रीवादळ आली. अतिवृष्टी, महापूर, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीतून लोक सावरत असतांना लगेच राज्यावर करोनाचे मोठे संकट आले. या अनेक संकटांचा सामना करत असतांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील नागरिकांचा जीव वाचविण्यासोबतच अनेक विकासाची कामे राज्यात केली. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कोरोनाकाळात झालेल्या कामाचे कौतुक अख्या जगभरात झाले.

मालेगावसारख्या ठिकाणी करोनाच्या परिस्थितीत आपण स्वतः जाऊन अनेक वेळा बैठका घेतल्या. आता आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ती म्हणजे अधिक अधिक लोक आपल्यासोबत जोडून घेण्याची. सरकार पडताना अनेक आरोप, प्रत्यारोप झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण मला त्यांना सांगायचे आहे की, ‘बड़ी से बड़ी हस्ती मिट गई हमें मिटाने में, तुम चाहे कितनी भी कोशिश करलो, तुम्हारी उम्र बीत जाएगी हमें झुकाने में’ या शायरीद्वारे विरोधकांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मजबूत झाली आहे. सत्ता असली काय आणि नसली काय. जनतेच प्रेम आमच्यावर नेहमी आहे. हे कधी तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही.

ते पुढे म्हणाले, राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्यानंतर आपण सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेतली. आणि आजही कुणालाही भेटण्याची आपली तयारी आहे. ओबीसींच्या आरक्षणाबाबत भाजपच्या लोकांनीच खोडा घातला केसेस दाखल केल्या आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत मध्यप्रदेशला जो निर्णय लागू झाला तो महाराष्ट्राला लागू होण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून बाठिया कमिशनचा अहवाल कोर्टात सादर केला जाणार आहे. अकरा तारखेला यावर सुनावणी होणार असून ओबीसींचे आरक्षण हे पूर्ववत होईल, त्यामुळे राज्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतींमधील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. यामध्ये देखील ओबीसींना आरक्षण मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, आमदार सरोज आहिरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, डॉ. सयाजीराव गायकवाड, रवींद्र पगार, अ‍ॅड. शिवाजी सहाणे, विनोद शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केले.

जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, धनंजय निकाळे, माजी नगरसेवक शैलेश ढगे, जगदीश पवार, सुषमा पगारे, शोभा आवारे, हरीश भडांगे, मधुकर मौले, मनोहर बोराडे, डॉ. योगेश गोसावी, सुरेखा निमसे, बाळासाहेब गीते, बाळासाहेब मते, राकेश मुंडावरे, डॉ.अमोल वाजे, मनोहर कोरडे, महेश भामरे, शंकर मोकळ, जीवन रायते, मुजाहिद शेख आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com