
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
येथील बस स्थानक (Bus station) परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र कचरा पडलेला दिसून येत आहे. सिन्नरचे (sinnar) वैभव म्हणून नावारुपास आलेल्या या वास्तुच्या परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे लक्ष दिले जात नसल्याने प्रवाशांसह नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेले हे बसस्थानक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात एक चर्चेचा विषय बनले होते. सिन्नरकरांसह सिन्नरमधून (sinnar) पुढे प्रवास करणार्याच्या नजरेत भरेल अशा या बसस्थानकात आज सर्वत्र कचरा (Garbage) पडलेला दिसून येत आहे. बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या कोपर्यात नेहमीच प्लॉस्टिक (Plastic), कागद, गुटखा व तंबाखुच्या रिकाम्या पुड्या दिसून येतात.
तर बस स्थानकासमोरील लॉनच्या जागेवर गवताऐवजी आता फक्त उघडी माती बघायला मिळत आहे. या लॉन परिसरात कचर्याचे ढिगच जमा झालेले रोज बघायला मिळतात. बसस्थानक परिसरातील झाडांची दयनीय अवस्था झाली असून याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. काळानूरुप ही झाडे नष्ट होत असून सुरुवातीला हिरवागार वाटणारा हा परिसर सध्या भकास होताना दिसून येत आहे.
बस स्थानकातील बाकांच्या बाजूने गुटखा (Gutkha) खाऊन थुंकण्याचे डागही येणार्या जाणार्याचे लक्ष वेधून घेत आहेत. जागोजागी गुटखे खाऊन पिंचकार्या मारणार्यांचीही येथे कमी नसल्याने हे किळसवाणे दुष्य बघून प्रवासी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
टवाळखोरांची गर्दी
गेल्या काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालये सुरु झाल्याने बसस्थानक परिसरात मुलींना छेडणारे व उगीच फेरफटका मारणार्यांची संख्या वाढली आहे. अनेक विद्यार्थी काम नसताना दिवसदिवस येथे टवाळकी करताना दिसून येतात. मुलींची छेड काढण्याचे व हाणामारीच्या घटनेतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनीही येथे लक्ष घालून अशा टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बेशिस्त वाहन पार्किंग
बसस्थानकात काम असणार्या किंवा जवळपास काही काम असणारे दुचाकीचालक आपली दुचाकी बेशिस्तपणे येथे पार्क करत असतात. त्यामुळे या दुचाकींच्या गर्दीतून धड चालता येत नसल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. सुरुवातीला याठिकाणी एक सुरक्षारक्षक या वाहनांची व्यवस्थितपणे पार्किग करत होता. मात्र, आता सुरक्षारक्षकच नसल्याने अशा बेशिस्त दुचाकीचालकांना कुणीची तमा नसल्याचे दिसत आहे.