ब्रम्हगिरी कचऱ्याच्या विळख्यात; गणपतबारीजवळ घाणीचे साम्राज्य

ब्रम्हगिरी कचऱ्याच्या विळख्यात; गणपतबारीजवळ घाणीचे साम्राज्य

नाशिक | मोहन कानकाटे

त्र्यंबकेश्वरपासून (Trimbakeshwar) जवळच असलेल्या गणपतबारीला ग्रामीण भागाचे (rural area) प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.

परंतु, याच प्रवेशद्वाराजवळ सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे (Garbage piles) दुर्गंधयुक्त घाणीचे वर्चस्व असल्याचे दिसते. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वर येथून हरसूल (harsul), मोखाडा (mokhada), जव्हार (javhar), पालघर (palghar), डहाणू (dahanu), सेलवासकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. तर याच मुख्य रस्त्याला ग्रामीण भागातील अनेक रस्ते जोडलेले असल्याने त्र्यंबकला जाणाऱ्या अनेक नागरिकांना या कचऱ्याचा ढिगाऱ्यापासून पसरणाऱ्या दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच नाशिकवरून (nashik) किंवा पालघरकडून येणारे वाहनचालक हे गाडीतील कचरा रस्त्याच्या कडेला फेकून देतात. त्याचबरोबर त्र्यंबकमधील काही हॉटेल व्यावसायिक देखील आपल्या हॉटेलमध्ये उरलेले शिळे अन्न (Stale food) गाडीमध्ये भरून रात्रीच्या सुमारास येथे आणून टाकतात. त्यानंतर हे अन्न कुजल्यावर त्याचा वास दूरवर पसरतो.

तर आसपासच्या गावातील नागरिकांची जनावरे याठिकाणी चरण्यासाठी येतात. त्या जनावरांनी हे शिळे अन्न किंवा जवळ पडलेले प्लास्टिक खाल्यास त्यांनाही गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे संबधित विभागाने याठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, गणपतबारी या ठिकाणाला श्रावण महिन्यात येणाऱ्या ब्रम्हगिरी प्रदक्षिणेचा अंतिम आणि शेवटचा टप्पा असल्याने विशेष महत्व आहे. तसेच याठिकाणी एक गणपती मंदीर असून या गणपतीच्या दर्शनाशिवाय भाविकांची प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. मात्र, सध्या या महत्वाच्या ठिकाणावर असलेल्या कचऱ्याच्या साम्राज्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रदूषण किंवा हवेच्या मार्फत गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता आहे.

गणपतबारी परिसरातील बराचसा भाग आमच्या गावाच्या हद्दीत येत असून गावातील नागरिकांची रस्त्याने दररोज ये-जा असते. तसेच गणपतबारीत टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधी पसरल्यास त्याचा त्रास गावातील नागरिकांना होऊ शकतो. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतमार्फत एक पत्र पोलिस स्टेशनला देणार असून कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करणार आहोत.

आशा पोटिंदे, सरपंच, पिंपळद, त्र्यंबकेश्र्वर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com