Video : नाशकात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; पालकमंत्री भुसेंनी धरला ढोल-ताशांच्या गजरावर ठेका
नाशिक | Nashik
राज्यात दहा दिवसांपूर्वी म्हणजेच गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) सगळीकडे गणपती बाप्पांचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आज गुरुवार (दि.२८ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi) गणपती बाप्पांचे विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मानाचे गणपती विसर्जित होणार असून ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे...
राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या नाशिकमध्ये देखील सकाळपासून मिरवणुकीला प्रारंभ झाला असून शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या क्रमानुसार मिरवणुका काढल्या जात आहेत. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्या हस्ते पूजा करून नाशिक शहरातील जुने नाशिक भागातील वाकडी बारव येथून ढोल, ताशांच्या निनादात व टाळ मृदृंगाच्या गजरात उत्साहात सुरुवात झाली.
तर मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील विविध गणपती मंडळांनी सहभाग नोंदविला. तसेच पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय मालेगावच्या प्रसिद्ध तीन पावलीवर देखील भुसे यांनी भन्नाट डान्स केला. तर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांनी नाशिक ढोल वाजवत आनंद लुटला. या गणपती विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पाच गणपतीसह २१ चित्ररथ सहभागी झाले आहेत. तसेच ६७ सीसीटीव्ही, ४ ड्रोन आणि शेकडो पोलिसांचा बंदोबस्त मिरवणुकीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, सध्या गणपती विसर्जन मिरवणूक हळूहळू विसर्जन मार्गावरून पुढे सरकत आहे. तसेच गणेश भक्तांकडून 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' असा जयघोष केला जात आहे. तर पालकमंत्री दादा भुसे यांनी गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेशमंडळांना आणि भाविकांना शुभेच्छा देत कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन उपस्थितांना केले आहे.