नाशिक । Nashik

रब्बी पिकांसाठी व एकलहरे औष्णिक केंद्रासाठी गंगापूर धरणातून पुढील पंधरा दिवस आवर्तन सोडले जाणार आहे. ७०० ते ८०० क्यूसेसने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे गोदामाई दुथडी भरुन वाहत आहे. सोमेश्वर धबधबाही खळखळला आहे.

गतवर्षी दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. त्यामुळे पिण्यासह सिंचन व उद्योगासाठी मागणीनूसार पाणी दिले जाणार असून आवर्तन निश्चित करण्यात आले आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पाटबंधारे विभागाच्या वतीने गोदावरी कालवे आणि एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी हे पाणी सोडण्यात आले. पुढील पंधरा दिवस गंगापूर धरणातून आवर्तन सोडले जाणार आहे. ७०० ते ८०० क्यूसेसने पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने नागरिकांनी नदी पात्र प्रवाहात उतरु नये असे आवाहन नाशिक पाटंबधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, मधल्या काळात गोदा नदीपात्राचे तळ काॅक्रिट काढुन प्राचीन कुंड जिवंत करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे धरणातून नदी पात्रात पाणी सोडणे बंद करण्यात आले होते. मात्र, रब्बीसाठी आवर्तन गरजेचे असल्याने काॅक्रिटीकरण काढण्याचे काम थांबवून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे एक ते दीड महिन्यांनी गोदामाई पुन्हा खळखळुन वाहिली.

पर्यटकांची गर्दी

गंगापूर धरणातून पाणी सोडले जात असल्याने सोमेश्वर धबधबा खळखळुन वाहत आहे. तसेच गोदापात्रही पाण्याणे लबालब भरले आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले सोमेश्वर धबधबा व गोदाकाठाकडे वळत आहे. रविवारच्या सुट्टिचा मुहूर्त साधत नाशिककरांनी वरील दोन्ही ठिकाणी गर्दी करत मनसोक्त आनंद लुटला.