गंगापूर धरण ५० टक्के भरले
नाशिक

गंगापूर धरण ५० टक्के भरले

गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्के जादा जलसाठा

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराची तहान भागविणारे गंगापूर धरण जुलैच्या पंधरवडयाच्या आतच ५० टक्के भरले आहे. नाशिककरांसाठी हा मोठा दिलासा असून अजून मान्सूनच्या हंगामाचे तीन महिने शिल्लक आहे. त्यामुळे यंदा देखील गंगापूर धरण शंभर टक्के भरुन अोव्हर फ्लो होण्याची चिन्हे आहेत. तर गंगापूर धरण समूहात ३४ टक्के जलसाठा आहे.

हवामान खात्याने यंदा देशभरात शंभर टक्क्यांपेक्षा जादा पाऊस होईल असा अंदाज वर्तविला आहे. महाराष्ट्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. मागील महिन्यात निसर्ग चक्रिवादळामुळे नाशिक शहर व जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. जिल्ह्याची जुनची सरासरी ही १७४ टक्के इतकी आहे. गत वर्षी जून महिना पूर्णपणे कोरडाठाक गेला होता. यंदा मात्र जूनने सर्व कसर भरुन काढत समाधानकारक हजेरी लावली. शिवाय गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर व अांबोली गावात पावसाचा जोर जास्त आहे. परिणामी नाशिक शहर व उपनगराची तहान भागविणार्‍या गंगापूर धरणाचा जलसाठा हा ५० टक्यांवर पोहचला आहे.

सद्यस्थितीत धरणात २ हजार ७८७ एमसीएफटी म्हणजे अडिच टिएमसीपेक्षा जादा पाणी आहे.आॅगस्ट व सप्टेंबर या महिन्यात पावसाचा जोर अधिक असतो. त्यामुळे पुढील काळात चांगला पाऊस झाल्यास गंगापूर धरण यंदाही अोव्हर फ्लो होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांचा वर्षभरासाठीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. शेती व उद्योगांसाठी आवर्तनाचे नियोजन करुन मराठवाडयासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडणे शक्य होईल. गतवर्षी आजमितिला गंगापूर धरणात ३८ टक्के जलसाठा होता. त्या तुलनेत १२ टक्के जादा जलसाठा गंगापूर धरणात आहे.

गंगापूर धरण समूहातील जलसाठा

गंगापूर - ५०

कश्यपी - २२

गौतमी गोदावरी - १९

आळंदी - ०

Deshdoot
www.deshdoot.com