File photo
File photo
नाशिक

नाशकात यंदा गणेशोत्सव साधेपणाने

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । दि. 6 प्रतिनिधी

शहरात दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन ज्या नियम व अटी ठरवेल त्याप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येईल असा निर्णय शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकमुखाने घेतला आहे. तीन फुट उंचीपर्यंतच्याच लहान गणेशमूर्तीची स्थापना करण्यासोबतच कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढण्याचाही सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तालयात नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी पोलीस अधिकारी यांच्यात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले-श्रींगी, विजय खरात, सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांच्यासह इतर अधिकारी तसेच नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर गजानन शेलार, विनायक पांडे, प्रथमेश गिते, शंकर बर्वे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावर्षी मिरवणुक न काढण्याचा, गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारे डिजे, लाऊडस्पिकरचा वापर न करण्याचा तसेच गणेशोत्सव मित्र मंडळांनी जास्तीत जास्त तिन फुटांच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा करुन गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

मित्रमंडळांनी लॉकडाऊन काळात गरजू नागरिकांना मास्क वाटप, औषधोपचार सेवा पुरविल्या असुन गणेशोत्सवादरम्यानही रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करुन लोकांमध्ये जनजागृती निर्माण करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा निश्चय पदाधिकार्‍यांनी केला.

मंडळाच्या सभासदांच्या पैशांतून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली जाणार आहे. पोलीस आयुक्त नांगरेे पाटील यांनीही या निर्णयाचे स्वागत करीत गणेशोत्सव मंडळांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगला आराखडा तसेच आचारसंहीता तयार करावी. नाशिक शहराचा आदर्श संपुर्ण महाराष्ट्रात घालुन दयावा, असेे आवाहन केले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com