शेडअभावी भरपावसात अंत्यविधी

शेडअभावी भरपावसात अंत्यविधी

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

‘सरण ही थकले मरण पाहुणी..., मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना...’ या काही एखाद्या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणार्‍या ओळी नसून प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) माळेगाव ग्रामपंचायत (Malegaon Gram Panchayat) मधील पिळूकपाडा येथे स्मशानभूमी (Cemetery) अभावी भरपावसात एका मृतदेहाची झालेली अवहेलनेची वस्तुस्थिती आहे.

पिळूकपाडा येथे एका वाहन चालकाचे निधन झाले. त्याचवेळी सकाळ पासूनच संततधार पावसामुळे (Heavy Rain) अंत्यसंस्कार (Funeral) करण्यासाठी गावात अद्यापही स्मशानभूमी शेडच नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा? असा प्रश्न नागरिकांना पडला. कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात.

पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात. काही जागरूक ग्रामस्थांनी सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेली स्मशानभूमीत स्वच्छता, आसन व्यवस्था, प्रसाधन गृह, वृक्षारोपण, दिवे, पावसाचे साठवलेले पाणी अशा सुख सोयी उपलब्ध केलेल्या आहे. तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमी करीता प्रतिक्षा करावी लागतेय हे न उलगडणारे कोडे आहे.

आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी (Fund) खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमी पर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते. तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

माळेगावच्या ग्रामपंचायतीत 7 गावे समाविष्ट आहे. माळेगाव, भरडमाळ, केळुणे, सालभोये, पिळूकपाडा, पाथर्डी, पारचापाडा या एकाही गावात स्मशानभूमी शेड उभारलेले नाही. त्यामुळे विना स्मशानभूमी विरहित एकमेव तालुक्यातील ग्रामपंचायत तर नाही ना असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com