चार्जिंग स्टेशनसाठी नाशिकला निधी

चार्जिंग स्टेशनसाठी नाशिकला निधी

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

नाशिक शहर ( Nashik City ) प्रदूषण व इंधनमुक्त व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले असून दिल्ली येथील यूएनडीपी कंपनी प्रशासनाने शहरातील पंधरा ठिकाणी चार्जिंग स्टेशन ( Charging Stations ) बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse )यांनी दिली.

नाशिक शहर स्मार्ट शहर म्हणून उदयास येणार असल्याचा गाजावाजा सध्या सर्वत्र सुरू आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. असे असले तरी शहर प्रदूषणमुक्त व्हावे यासाठीही उपाययोजना करण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी शहरातील विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांकडून खा. गोडसेंकडे सतत होत होती. त्याची दखल घेत खा. गोडसे यांनी यूएनडीपी कंपनी प्रशासनाशी संपर्क साधून शहरात चार्जिंग स्टेशन उभारण्याकामी आपल्या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ही मागणी कंपनी प्रशासनाला न्यायिक वाटल्याने कंपनी प्रशासनाने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून शहरात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.

याविषयीचे पत्रदेखील महानगरपालिका प्रशासनाला पाठवले होते. याची दखल घेत मनपा प्रशासनाने शहरात पंधरा ठिकाणी चार्जिंग स्टेशनच्या लोकेशनचा प्रस्ताव यूएनडीपी कंपनी प्रशासनाला पाठवला आहे. यामध्ये मनपा राजीव गांधी भवन, मनपा पूर्व, पश्चिम, नाशिकरोड, सातपूर, पंचवटी विभागीय कार्यालये, बिटको हॉस्पिटल, डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल, महाकवी कालिदास कला मंदिरासमोरील पार्किंग, इच्छामणी मंगल कार्यालय, बोधलेनगर, लेखानगर, गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यान, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक या लोकेशनचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com