ताहाराबाद-नामपूर रस्ता रुंदीकरणासाठी निधी मंजूर

25 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी - आ. बोरसे
ताहाराबाद-नामपूर रस्ता रुंदीकरणासाठी निधी मंजूर

मुंजवाड । वार्ताहर

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ते नामपूर या 24 कि.मी. रस्ता रूंदीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मार्ग निधीमधून 25 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असल्याची माहिती आ. दिलीप बोरसे यांनी दिली.

बागलाण या आदिवासी विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे व धावपट्टीच्या कडा तुटल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. त्यामुळे दैनंदिन घडणार्‍या अपघातांना स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागत होते.

मतदारसंघातील रस्ते प्राधान्याने केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत मंजूर करावेत, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती, असे आ. बोरसे यांनी नमूद करत त्यानुसार पहिल्या टप्प्यात रस्त्याचे अहवा-ताहाराबाद-नामपूर-लखमापूर रस्ता रा.मा. 20 कि.मी. 54/00 ते 25.00 कोटी 78.00 (भाग- ताहाराबाद ते नामपूर ) असा 24 किलोमीटरचा रस्ता रूंंद होणार आहे.

हा रस्ता सध्या 7 मीटर रूंद असून तो आता 10 मीटर रूंद होणार आहे. तसेच ब्लॅक स्पॉटदेखील काढले जाणार आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. लवकरच या कामाची निविदा निघून कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आ. बोरसे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com