ऑक्सिजन यंत्रणेसाठी सहा लाखांचा निधी

कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
ऑक्सिजन यंत्रणेसाठी सहा लाखांचा निधी

कळवण । प्रतिनिधी

कळवण तालुक्यात करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी 6 लाख 31 हजार रुपयांचा निधी संकलन करून आ. नितीन पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द करून सामाजिक बांधिलकी जोपासली. आता त्या निधीतून कळवण, अभोणा आणि मानूर कोविड सेंटरला जम्बो ऑक्सिजन सिलिंडर व ऑक्सिजन मशीन, आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध होणार असल्यामुळे तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

आ. नितीन पवार यांनी कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा निधीचा धनादेश स्वीकारून आभार मानले असून शिक्षकांच्या निधीचा धनादेश गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांच्याकडे सुपूर्द करून त्यातून जम्बो ऑक्सिजन सिलिंडर व ऑक्सिजन मशीन, आवश्यक साधनसामुग्री खरेदी करण्याची सूचना आ. पवारांनी यावेळी केली. कळवण तालुक्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून करोनामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असल्यामुळे कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन मशीनची मदत करावी, असे आवाहन आ. पवार यांनी मागील सप्ताहात केले होते.

आ. पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, आदिवासी शिक्षक संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख सभा, मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षक भारती, मुख्याध्यापक शिक्षक संघटना, अपंग कर्मचारी संघटना या संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेऊन गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांच्याशी चर्चा करून करोना संकटकाळात सामाजिक बांधिलकी जोपसण्याची भूमिका मांडली. कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी आवाहनाला प्रतिसाद देऊन अवघ्या दोन दिवसात 6 लाख 31 हजार रुपयांचा निधी संकलित केला असून निधीचा धनादेश आ. पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

आता त्या निधीतून कळवण तालुक्यातील कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन मशीन, आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, भूषण पगार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, डॉ. नीलेश लाड, डॉ. पंकज जाधव, डॉ. पराग पगार, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील, शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी संजय देशमुख, संजय शिंदे, संजय पाटील, भास्कर भामरे, दीपक जगताप, शामराव भोये, दीपक वाघ, बाबूलाल सोनवणे, नीलेश भामरे, सुनील गांगुर्डे, परमेश खैरनार, संभाजी पवार, दादाजी देवरे आदी उपस्थित होते.

आपत्तीकाळात सामाजिक जबाबदारी ओळखून कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मोठा आदर्श घालून दिला आहे. करोनाविरोधातील लढाईत प्राथमिक शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामपातळीवर शिक्षकांचा मोठा प्रभाव असतो. त्याचा उपयोग करून ग्रामीण व आदिवासी भागात लसीकरणबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षकांनी आता पुढाकार घ्यावा.

नितीन पवार, आमदार, कळवण

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com