चतुर्थश्रेणी कर्मचा-यांकडून २५ कोटी रुपयांचा निधी जमा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द
चतुर्थश्रेणी कर्मचा-यांकडून २५ कोटी रुपयांचा निधी जमा

कसबे सुकेणे । Kasbe Sukene

कोरोना आपत्ती निवारणासाठी आपला खारीचा वाटा उचलत सुमारे अडीच लाख राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांनी मे २०२१ महिन्यातील एक दिवसाचे वेतन सुमारे २५ कोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसीठी जमा केले असल्याची माहिती सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली आहे.

करोना आपदग्रस्त स्थितीच्या या दुस-या टप्प्यात राज्यातील जनतेला धीर देत अतिशय संयमाने मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी प्रभावी उपाययोजना आखत आहेत. राज्यावरील संसर्गाचे हे संकट एकजुटीने दूर करण्यासाठी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्याला संघटनेने प्रतिसाद देत राज्यातील कोरोना बाधितांवरील उपचारासाठी तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी निधी कमी पडू नये, यासाठी महाराष्ट्रातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचीदेखील खंबीर साथ आहे, अशी ग्वाहीदेखील कर्मचा-यांच्या वतीने भाऊसाहेब पठाण यांनी दिली आहे.

संघटना ही मान्यताप्राप्त असल्यामुळे पगार कपातीसाठी व्यक्तिगत संमतीची गरज नाही तसेच अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःहून हे वेतन जमा करण्याचा मनोदय संघटनेकडे व्यक्त केला आहे. त्याशिवाय सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचा-यांनीही त्यांचे मे महिन्यातील एक दिवसाचे निवृत्तीवेतन संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे पत्र मुख्य सचिव सीताराम कुंटे, अप्पर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक तसेच उपसचिव टी. व्ही. करपते यांनाही पाठविण्यात आले आहे. या पत्रावर अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने, कार्याध्यक्ष भिकू साळुंखे, कोषाध्यक्ष मार्तंड राक्षे, कार्यालय सचिव बाबा कदम यांच्या सह्या आहेत.

राज्यातील कोरोना बाधितांवरील उपचारासाठी तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी निधी कमी पडू नये, या संकटात आम्ही राज्य शासनाच्या पाठीसी आहे, महाराष्ट्रातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचीदेखील खंबीर साथ आहे, म्हणुन मे २०२१ महिन्यातील एक दिवसाचे वेतन सुमारे 25 कोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसीठी जमा केले.

- भाऊसाहेब पठाण, अध्यक्ष, चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com