सर्व्हिसरोड प्रकाशमय करण्यासाठी निधी मंजूर

सर्व्हिसरोड प्रकाशमय करण्यासाठी निधी मंजूर

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

नाशिक शहरासह परिसरातील महामार्गावरील अपघातांचे ( Accidents on Highways )आणि अंधारातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग प्रकाशमय व्हावे, यासाठी खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse ) यांच्याकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority of India)नाशिक शहरासह वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल प्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोड प्रकाशमय करण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली असून विजेचे 924 पोल उभारण्यात येणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे आता महामार्ग प्रकाशमय होणार असून रात्रीच्या अंधारात हकनाक होणारे अपघात टळणार असल्याचा विश्वास खा.गोडसे यांनी व्यक्त केला.

नाशिक शहर परिसरातील आणि नाशिक-आग्रा महामार्गावर विजेचे पोल फारच कमी व सतत बंद स्थितीत असल्याने महामार्गावर कायमच लहान,मोठे अपघात होत असतात. पावसाळ्यात अपघातांच्या प्रमाणात मोठया प्रमाणावर वाढ होत असते. या अपघातामुळे काहींनी जीव गमावलेला असून अनेकांच्या वाट्याला कायमचेच अपंगत्व आलेले आहे.

अंधाराचा फायदा घेत लुटारूंकडून रस्त्यावरील प्रवाशांना लुटल्याच्या अनेक घटना घडतच असतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी महामार्गावर प्रखर उजेड घेणार्‍या एलईडी असावे, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खा. गोडसे प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. केंद्राच्या भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने नाशिक शहर परिसरातील मुंबई-आग्रा महामार्ग तसेच वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल फ्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोडवर विजेचे पथदिपे बसविण्यासाठी आणि त्याच्या देखभाल करण्यासाठी 8 कोटी 76 लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com