दीड कोटींचा निधी शासनाला परत

प्रशासनाच्या गलथान कारभाराने शाळा दुरूस्ती नाही
दीड कोटींचा निधी शासनाला परत

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातंर्गत शाळा दुरूस्तीसाठी निधी मिळावा, यासाठी सदस्य आटापीटा करत असताना दुसरीकडे शाळा दुरूस्तीसाठी प्राप्त झालेला दीड कोटींचा निधी खर्चाअभावी शासनाला परत गेला असल्याचे समोर आले आहे. वर्षभराभूर्वी निधी प्राप्त होऊन केवळ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हा निधी खर्च झाला नसल्याचे बोलले जात आहे. या निधीची फाईल वर्षभर चर्चेच्या फेर्‍यात अडकल्याने त्यास विलंब झाल्याचे सांगितले जात आहे.

ग्रामीण भागातील शाळा दुरूस्त्यांसाठी 26 मार्च 2019 रोजी दीड कोटींचा निधी जिल्हा परिषदेला मंजूर झाला होता. प्रत्यक्षात, जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी मार्च 2020 मध्ये प्राप्त झाला. प्राप्त झाल्यानंतर शिक्षण समितीने या निधीचे नियोजन करून 55 शाळा दुरूस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासनाला सादर केला. याच दरम्यान, करोनामुळे लॉकडाऊन राज्यात लागले. यात शासनाने 4 मे 2020 रोजी आदेश काढत खर्चावर बंधने टाकली. त्यामुळे सदर प्रस्ताव निधीची खात्री करून मंजुरी द्यावी,असा आक्षेप लागला.

सहा ते सात महिन्यानंतर करोनाचे संकट कमी झाल्यानंतर, सदर कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर, प्रस्ताव पुन्हा नव्याने सादर झाला. मात्र, प्रशासनाच्या चर्चेत ही फाईल 3 ते 4 वेळा अडकली. शिक्षण विभाग अन प्रशासनाच्या समन्वय नसल्याने ही फाईल दोन महिने चर्चेविना पडून रहिल्याचे विभागाकडून सांगितले जात आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे अनेकदा फाईल पाठविण्यात आली. मात्र, त्यांच्यावर चर्चा करावी असाच शेरा लिहिण्यात आल्याचेही सेवकांंकडून सांगितले जात आहे

पाठपुराव्यानंतर 2 मार्च 2021 रोजी शाळा दुरूस्तींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर 22 मार्च 2021 रोजीच्या काम वाटप समिती बैठकीत त्याचे वाटप झाले. काम वाटप झाल्यानंतर फाईली शिक्षण विभागात गेल्या. तेथे करोनाचे कारण सांगत फाईली महिनाभर पडून रहिल्याने या कामांचे कार्यारंभ आदेश झाले नाही. काही कामांचे कार्यारंभ आदेश झाले. त्या फाईली अंतिम मंजुरीकरिता पाठविण्यात आल्या असता निधी नसल्याचे सांगितले गेले. सदर निधी खर्चाला 31 मार्च 2021 अखेर मुभा होती. मात्र, प्रशासनाच्या चर्चेच्या कारभारात हा निधी खर्चाविना शासनाकडे जमा झाल्याचे बोलले जात आहे.

शाळा दुरूस्तीसाठी निधी मिळावा यासाठी आम्ही सदस्य भांडतो. मात्र, प्रशासनाच्या चुकीच्या कामकाजामुळे निधी खर्चाविना शासनाकडे परत गेला आहे. या अखर्चित निधी प्रकरणी संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.

- डॉ. आत्माराम कुंभार्डे, गटनेता, भाजप जि. प.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com