
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
धुळे लोकसभा मतदार संघातील (Dhule Lok Sabha Constituency) रस्त्यांच्या कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Gramsadak Yojana) प्रस्तावित केलेल्या 105 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे 80 कोटी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
धुळे लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात रस्त्यांची कामे उत्कृष्ट पद्धतीने होण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे ग्रामीण, शिंदखेड़ा, मालेगाव व बागलाण (Shindkheda, Malegaon and Baglan) तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांच्या समावेश प्रधानमंत्री ग्रामसड़क योजनेत करण्यात आला.
येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत या रस्त्यांच्या कामाचा समावेश होण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा केलेला होता.
त्या अनुषंगाने केंद्र शासनाने या रस्त्याच्या कामांना मंजुरी दिली. यामध्ये धुळे ग्रामीण हद्दीतील शिरूर विंचूर ते दोंदवाड, बाळापुर-वडजाई ते पिंप्री, निमडाळे ते खेड, वडजाई, नेर (महाल नूर नगर) ते कावठी या रस्त्यांचा समावेश आहे. शिंदखेड़ा मधील शिंदखेडा ते वरुळ, माळीच-कलमाडी - वाघाडी बुद्रुक ते कंचनपूर रस्ता, हूंबर्डे ते पाष्टे बेटावर यांचा समावेश आहे.
मालेगाव तालुक्यातील मथुरापाड़े ते नीमगांव रोड, दाभाड़ी साखर कारखाना ते भायगाव या रस्त्यांचा समावेश आहे.
बागलाण तालुक्यातील, बंधारपाड़े- वनोली - चौधाने फाटा, नामपुर-फोकीर- गोराने- आसखेडा, सोमपूर- दरेगाव- कातरवेल, रा. मा 19 चौधाने फाटा- जोरण - मोरकुरे-पठावे दिगर, एकलहरे रोड -जायखेडा- लाडूद कामांचा समावेश असून त्यासाठी, एकूण 80 कोटी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात यश आले असून लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामांना सुरुवात करण्यात येईल अशी माहिती खा. डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी दिली.