सरसकट भरपाई द्यावी : वनारसे

सरसकट भरपाई द्यावी : वनारसे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई देण्याचे प्रायोगिक निकष सरसकट सर्वच शेतकर्‍यांना लागू केले जातात.

मात्र, नुकसानीचे प्रमाण कमी जास्त असल्याने शेतकर्‍यांना कमी प्रमाणात भरपाई मिळते. प्रसंगी मिळतच नाही. त्यामुळे क्षेत्रनिहाय पंचनामे करुन सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी केली आहे.

निफाड तालुक्यात एकूण 92 महसूल मंडळे आहेत. प्रत्येक मंडळातील तलाठी, तहसीलदार, प्रांत आदी अधिकारी हे दोन शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पीक कापणी प्रयोग करतात. त्याआधारे शासनाने ठरवून दिलेल्या निकषांचा आधार घेऊन सरसकट पंचनामे नोंदवतात.

त्यानुसार शेतकर्‍यांना भरपाई मिळते. परंतु, अधिकारी हे खोलात जाऊन पीकपाहणी करत नसल्याने नदीच्या कडेला किंवा पाण्याखाली गेलेल्या पिकांचे नमूने तपासत नाहीत. त्यामुळे या शेतकर्‍यांना तुटपूंजी भरपाई मिळते. प्रसंगी मिळतही नाही.

सध्या परतीचा पाऊस सुरू असल्यामुळे निफाड तालुक्यात द्राक्ष आणि सोयाबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबिनला तर शेंगाच आलेल्या नाहीत. महाबिजचे पेयाणे पेरलेले असताना ही अवस्था झाल्यामुळे त्याविषयी देखील अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.

येत्या सोमवारी (दि.12) अधिकारी पीक कापणी प्रयोग राबवणार असून, त्याआधारे शेतकर्‍यांना पीककर्जाचा लाभ मिळेल. परंतु, जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतात हा प्रयोग राबवावा, अशी मागणी निफाड तहसीलदारांकडे केली जाणार असल्याचे सिध्दार्थ वनारसे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com