मनपा शहर बससेवेपुढे इंधनाची अडचण

मनपा शहर बससेवेपुढे इंधनाची अडचण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेने शहरात बससेवा ( NMC Bus Service )सुरू केली असून या बसेस सीएनजीवर ( CNG )चालवण्यात येत आहेत. तथापि सध्या 20 बसलाच सीएनजी मिळत आहे. सीएनजीच्या तुटवड्यामुळे आगामी काळात नवीन बस सुरू करण्यासाठी अडचण उभी राहणार आहे.

नाशिक महापालिकेने शहरात शहर बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 8 जुलैपासून शहरात शहरबससेवा सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 52 बसेस सध्या कार्यरत करण्यात आलेल्या आहे.

मात्र यातील केवळ 20 गाड्यांनाच पुरेल एवढा सीएनजीचा पुरवठा करण्यात येत आहे. सीएनजीचा पुरवठा करणारी कंपनी ही पुण्याची असून त्यांच्याकडे वारंवार मागणी करूनही सीएनजीचा आवश्यक तो पुरवठा होण्यास अडचण येत आहे. त्यामुळे नव्याने बस सुरु करण्यास अडचणी येत आहेत.

परिवहन समितीच्यावतीने आत्ता किमान 40 गाड्यांना सीएनजी देण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिक शहरात सध्या असलेल्या खाजगी सीएनजी पंपावरच नागरिकांना तासन्तास उभे राहून सीएनजी मिळवावा लागत असतो.

सीएनजी कंपनीने पाथर्डी परिसरात सीएनजीचा मदर हब उभारण्याची तयारी सुरु केली होती. 15 ऑगस्टपर्यंत हे काम पुर्ण करून तो हब कार्यान्वीत होईल असेही सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ना हब उभा राहिला ना तो कार्यान्वित झाला. त्यामुळे पुढील काळात सीएनजीच्या तुटवड्यामुळे बससेवेला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com