पिस्तूलाचा धाक दाखवून टोळीकडून जबरी लूट

दोन लाख ६६ हजारांची लूट
पिस्तूलाचा धाक दाखवून टोळीकडून जबरी लूट

पंचवटी | Panchavti

चामरलेणी परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या चौघा युवकांना पिस्तूलाचा धाक दाखवून चौघा जणांच्या टोळीने जबरी लूट केल्याची घटना घडली असून, यात सुमारे दोन लाख ६६ हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेण्यात आला आहे.

याप्रकरणी ब्रज अक्षय शहा (१८, रा. विजय नगर कॉलनी औरंगाबाद नाका पंचवटी) याने दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ब्रज शहा व त्याचे अन्य तीन मित्र हे रविवारी (दि.०२) चामरलेणी परिसरात फिरण्यासाठी गेले होते. डोंगराच्या पायथ्याशी ते एकमेकांचे फोटो काढत असताना या ठिकाणी चार अनोखळी इसम आले.

त्यातील एकाने ब्रज यांना पिस्तुलचा धाक दाखवून तर त्याच्या अन्य साथीदारांनी इतर चौघांकडील रोख रक्कम, सोन्याचे ब्रेसलेट, चेन आणि मोबाइल असा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. तसेच या चौघांना मारहाण, दमदाटी व शिविगाळ करून पळ काढला.

यात संशयितांनी रोख रकमेसह एक तोळ्याचे एक आणि अर्धा ग्रॅम वजनाचे एक अशी दोन सोन्याची ब्रेसलेट, दोन/दोन तोळ्याच्या दोन सोन्याच्या चेन आणि पाच महागडे आयफोन असा सुमारे एकूण दोन लाख ६६, हजार पाचशे रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक व्ही. के. माळी हे पुढील तपास करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com