उद्योगांसाठी मालवाहतूक सेवा उपलब्ध

उद्योगांसाठी मालवाहतूक सेवा उपलब्ध

राज्य परिवहन महामंडळास मालवाहतुकीस परवानगी

सातपूर । प्रतिनिधी Satpur

करोनाच्या परिस्थितीमुळे वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन महामंडळास मालवाहतुकीस परवानगी दिलेली आहे.

उद्योग व्यवसायासाठी व कारखान्यातील उत्पादित केलेला माल व ऑर्डर्स तातडीने ग्राहकांपर्यंत पोहचता यावा यासाठी राज्य परिवहन मंडळातर्फे प्रवाशी वाहतुकीबरोबरच, कारखान्यांमध्ये तयार होणार माल व उत्पादनासाठी आवश्यक असणार्‍या कच्च्या मालाची वाहतूक केली जाणार असल्याचे परिवहन अधिकारी विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी सांगितले.

आयामा रिक्रिएशन सेंटर येथे आयोजित बैठकीत मैंद यांच्यासह विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील, हरीश पाटील, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सचिव राजेंद्र पानसरे व राज्य परिवहन महामंडळाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित विषयावर विस्तृत चर्चा झाली.

यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकार्‍यांनी महामंडळास महाराष्ट्र राज्यात वाहतुकीचा प्रदीर्घ अनुभवासोबतच, तात्काळ सेवा, माफक दर, सुरक्षित सेवा, वेळेवर वितरण आदी सुविधा उपलब्ध असून सर्व उद्योगांनी माल वाहतुकीसाठी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन अधिकार्‍यांनी आयमा सभासदांना केले.

Deshdoot
www.deshdoot.com