नाशिक

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोफत अभ्यासिका सुरू केल्या जाणार आहेत. पुढील वर्षी सुरू होणार्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सारडा उद्योग समूहातर्फे हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सिन्नर आणि नाशिक तालुक्यातील पाच सर्वप्रथम प्रतिसाद देणार्या गावांचा यात समावेश केला जाणार आहे.

दोन हजारापेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या निवडक गावांमधील जे विद्यार्थी शाळा शिकत आहेत; अथवा जे विद्यार्थी किमान दहावी इयत्ता उत्तीर्ण आहेत, असे शाळाबाह्य विद्यार्थी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या अभ्यासिकांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, ज्यामध्ये अभ्यासिकेसाठी व्यवस्थापक, संगणक, इंटरनेट, तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी पुस्तके, मार्गदर्शिका, दैनिक वर्तमानपत्रे, विविध खेळांचे साहित्य- ज्यामध्ये इनडोअर आणि आऊट डोअर क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. गणित, विज्ञान, संगणक या विषयांवरील खास तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.

कौशल्य विकास आणि नोकरीची हमी

सर्वात महत्वाचे म्हणजे संबंधित गावातील विद्यार्थी / विद्यार्थिनी साठी विशिष्ट कौशल्य प्राप्त करण्याची संधी या उपक्रमाद्वारे मिळणार आहे; ज्याद्वारे अल्पावधीत कोर्स पूर्ण करून संबंधित विद्यार्थांना नोकरीची हमी दिली जाणार आहे. यासाठी 'प्रथम' या संस्थेबरोबर सारडा उद्योग समूह संलग्न असून त्यांच्या माध्यमातून या संधी उपलब्ध होणार आहेत. या कौशल्य विकासाच्या योजनेमध्ये हॉटेल मॅनेजमेंट, की ज्यामध्ये हाऊस कीपिंग, उत्पादन, सेल्स असे विभाग आहेत, तसेच ब्युटीपार्लर, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, नर्सिंग असिस्टंट, प्लंबिंग, बांधकामाच्या संबंधित कोर्सेसचा पण समावेश आहे. यासाठी 'प्रथम' या संस्थेकडून त्यांची मार्गदर्शक टीम संबंधित गावात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल. आजपर्यंत सारडा उद्योग समुहाच्या माध्यमातून 399 विद्यार्थी/विद्यार्थिंनींनी विविध प्रकारची कौशल्य प्राप्त केली असून ते सर्व नोकरी/व्यवसायातून अर्थाजन करत आहेत, तर आजमितीस 178 विद्यार्थी/विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत.

वरील उपक्रमासाठी इच्छुक सिन्नर व नाशिक तालुक्यातील गावांमध्ये विनामूल्य तत्वावर ग्रामपंचायत अथवा जागा मालकांकडून किमान 300 स्क्वेअर फूट बांधीव जागा उपलब्ध झाल्यास अशा गावांमध्ये प्राधान्याने हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. इच्छुक ग्रामपंचायत अथवा संबंधित घरमालकांनी खालील पत्यावर संपर्क करण्याचे आवाहन सारडा उद्योग समूहाने केले आहे.

पत्ता : श्रीरंग किसनलाल सारडा चॅरिटेबल फाउंडेशन, कॅमल हाऊस, नाशिक पुणे रोड, नाशिक - 422011, संपर्क क्रमांक :0253- 2594231, 32, 33, 34